Join us  

Air India: टाटाकडे जाऊदे, की...! एअर इंडिया तशीच राहणार; खटारा विमान पाहून म्हणाल आपली एसटीच बरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 4:56 PM

Air India: डीजीसीएने टाटा ग्रुपच्या मालकीच्या एअर इंडियाला त्या खटारा विमानाची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

हजारो कोटींच्या कर्जाच्या गाळात आणि तोट्यात रुतलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियाटाटाने ताब्यात घेऊन आता तीन महिने लोटले आहेत. तरीही एअर इंडियामध्ये सुधरण्याची काही चिन्हे दिसून येत नाहीएत. नुकताच काही दिवसांपूर्वी तर एका खटारा विमानाचे फोटो एका प्रवाशाने पोस्ट केले आहेत. ते पाहून तुम्ही म्हणाल की आमची एसटी यापेक्षा खूप बरी. 

डीजीसीएने टाटा ग्रुपच्या मालकीच्या एअर इंडियाला त्या खटारा विमानाची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. एका प्रवाशाने सोशल मिडीयावर विमानातील सीटचा तुटलेला आर्मरेस्ट, घाण झालेले इंटेरिअर आदींचे फोटो पोस्ट केले होते. यानंतर अन्य प्रवाशांनीही त्यांना आलेले अनुभव, फोटो शेअर केले आहेत. 

DGCA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रवाशाच्या या तक्रारीची दखल घेतली आहे. विमानाची डागडुजी केली जात आहे.  A320 VT-EDF हे विमान सोमवारी रात्री (२५ एप्रिलला) कोलकातामध्ये होते. तिथेच या विमानाची दुरुस्ती केली जाणार आहे. 

डीजीसीएने गेल्या आठवड्यात स्पाईस जेटच्या विमानाच्या घाणेरड्या सीट आणि केबिन पॅनलमध्ये नादुरुस्तीच्या तक्रारीमुळे विमान उड्डाण करण्यापासून रोखले होते. स्वच्छता आणि दुरुस्ती केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या विमानाला उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली. SpiceJet कडून सांगण्यात आले की, जसे विमान बंगळुरू विमानतळावर उतरले तसे ते साफसफाईसाठी नेण्यात आले. याचाच संदर्भ देत एअर इंडियाच्या प्रवाशाने हे ट्विट केले होते. टाटा ग्रुपने एअर इंडियाला २७ जानेवारीला ताब्यात घेतले होते. 

टॅग्स :एअर इंडियाटाटा