Join us  

एअर डेक्कनची महाराष्ट्रातील सेवा बंद; ‘उडान’ अंतर्गत परवाना रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 12:14 AM

एअर डेक्कन कंपनीची महाराष्ट्रातील सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) त्यांचा ‘उडान’ अंतर्गत सेवा देण्याचा परवाना रद्द केला आहे.

मुंबई : एअर डेक्कन कंपनीची महाराष्ट्रातील सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) त्यांचा ‘उडान’ अंतर्गत सेवा देण्याचा परवाना रद्द केला आहे. कंपनीने ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेत सातत्याने अनियमितता दाखवल्यानेच ही कारवाई करण्यात आली आहे.केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा ‘उडान’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी एएआय ही देश पातळीवरील नोडल संस्था नियुक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रातात हे काम राज्य सरकारच्या महाराष्टÑ विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) आहे. एअर डेक्कनने एएआयकडून परवाना घेऊन महाराष्ट्रातात कोल्हापूर, जळगाव व नाशिक या नियमित विमानसेवा नसलेल्या शहरांना हवाईमार्गे जोडले होते. पण या मार्गावर नियमित सेवा सुरू न ठेवल्याबद्दल कंपनीचा परवाना आता रद्द झाला आहे.याबाबत एमएडीसीचे कार्यकारी संचालक सी.एस. गुप्ता यांनी सांगितले की, एअर डेक्कनच्या सेवेसाठी संबंधित तिन्ही विमानतळांवर एमएडीसीने कोट्यवधी खर्चून अनेक सोई-सुविधा उभ्या केल्या होत्या. हे सर्व केल्यानंतरही एअर डेक्कनची सेवा नियमित नव्हती. अनेकदा ही उड्डाणे रद्द केली जात होती. दिलेल्या सोई-सुविधांचासुद्धा कंपनीने योग्य वापर केला नाही. यामुळे एमएडीसीने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार आता एएआयने त्यांचा परवाना रद्द केला आहे.दरम्यान, ‘उडान’ अंतर्गत ट्रू जेट या कंपनीने दोनच दिवसांपूर्वी नांदेड-हैदराबाद व नांदेड-मुंबई या सेवेचा शुभारंभ केला. लवकरच नांदेड-दिल्ली व नांदेड-अमृतसर सेवाही सुरू होणार आहे.सेवा अनियमित‘उडान’ अंतर्गत एअर डेक्कनला कोल्हापूर-मुंबई, जळगाव-नाशिक-पुणे व जळगाव-नाशिक-मुंबई या मार्गावरील विमानसेवेसाठी परवाना मिळाला होता. यापैकी कोल्हापूर-मुंबई विमानसेवा काही प्रमाणात नियमित होती. पण उर्वरित दोन मार्गावरील सेवा अनियमित होत्या.

टॅग्स :विमान