Join us

बँकिंग क्षेत्राला AI चा धोका? ३० ते ४० टक्के नोकऱ्यांवर कोसळणार कुऱ्हाड? 'या' क्षेत्रांनाही भिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:24 IST

ai threat : दिवसेंदिवस आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय टेक्नोलॉजी प्रगत होत आहे. याचा काही क्षेत्रांवर सकारात्मक तर काही ठिकाणी नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

ai threat : तंत्रज्ञानाने माणसाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल केले आहेत. आता असंख्य गोष्टी हातातील मोबाईलवरुन नियंत्रित केल्या जात आहेत. या सर्वांची कडी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता असणार आहे. हे तंत्रज्ञान अगदी मानवी मेंदूप्रमाणे काम करत आहे. एकीकडे माणसाचं काम सुलभ होत असलं तरी हे तंत्रज्ञान आता असंख्य लोकांच्या नोकऱ्या खाण्याची भिती निर्माण झाली आहे. प्रसिद्ध ड्यूश बँकेचे मुख्य तंत्रज्ञान, डेटा आणि इनोव्हेशन ऑफिसर बर्न्ड ल्यूकर्ट यांच्या एका विधानाने ही भीती आणखी बळकट झाली आहे.

बर्न्ड ल्यूकर्ट यांच्या मते, एआय आणि जनरेटिव्ह एआय (ZEN AI) मुळे बँकिंग क्षेत्रातील ३० ते ४० टक्के नोकऱ्यांमध्ये बदल होणार आहे. तर काही नोकऱ्या पूर्णपणे संपणार आहेत. बेंगळुरू येथे आयोजित 'बँक ऑन टेक' कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. बँकिंग हे अत्यंत नियमन केलेले क्षेत्र असून अजूनही एआयबाबत अनेक वादविवाद सुरू आहेत. या क्षेत्रात एआयचा वापर करण्यात अनेक आव्हाने आहेत. कारण, एआयचे निकाल निश्चित नसतात. या क्षेत्रात निमय आधारीत प्रणाली आवश्यक आहे. जेणेकरून ते सहजपणे ऑडिट आणि देखरेख करू शकतील. बँकिंग उद्योगाने एआय स्वीकारणे आवश्यक असल्याचेही ल्यूकर्ट म्हणाले.

बँकिंग क्षेत्रात नोकऱ्यांवर गदा?बँकेचे सीईओ दिलीपकुमार खंडेलवाल म्हणाले की क्लाउड, एआय आणि झेन एआय सारख्या तंत्रज्ञानामुळे बँकिंग क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. ते म्हणाले, "आधी महसूल आणि ग्राहक वाढवण्यासाठी अधिक लोकांची गरज होती. पण आता आम्ही अधिक लोकांना कामावर न घेता तंत्रज्ञानात गुंतवणूक करून व्यवसाय वाढवत आहोत."

कोणत्या क्षेत्रात एआयचा नोकऱ्यांसाठी धोका?

  • उत्पादन : उत्पादन क्षेत्रावर एआयचा परिणाम कमी अपेक्षित आहे. याचे कारण औद्योगिक रोबोट मानवी श्रमाच्या तुलनेत लवचिक आणि किफायतशीर नसतात. म्हणजेच कारखान्यांमध्ये अजूनही मानवी मजुरांची गरज भासणार आहे.
  • इन्व्हेंटरी आणि सप्लाय चेन : इन्व्हेंटरी आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये, एआयचा वापर मानवी श्रमांना बदलण्याऐवजी मदत करण्यासाठी केला जाईल. एआय सिस्टम डेटाचे विश्लेषण करून प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवू शकतात.
  • बीपीओ : एआयमुळे बीपीओ (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) क्षेत्राला सर्वाधिक फटका बसेल. जनरेटिव्ह एआय टूल्स, जसे की चॅटबॉट्स, नियमित कॉग्निटिव टास्क्स सहजपणे हाताळू शकतात.
  • आरोग्यसेवा, हवामान आणि शिक्षण : एआय आरोग्यसेवा, हवामान अंदाज आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रातील विकासातील अंतर भरून काढण्यास मदत करू शकते.
  • सेवा क्षेत्र : सेवा क्षेत्रात एआयचा व्यापक वापर नोकऱ्यांमध्ये पूर्णपणे बदल घडवून आणू शकतो. काही नोकऱ्या पूर्णपणे संपुष्टात येतील. एआय टूल्स ग्राहक सेवा, डेटा विश्लेषण आणि इतर नियमित कार्ये स्वयंचलित करू शकतात, ज्यामुळे मानवी कर्मचाऱ्यांची गरज कमी होते.
टॅग्स :आर्टिफिशिअल इंटेलिजन्सबँकिंग क्षेत्रबँक