Join us
Daily Top 2Weekly Top 5

AIमुळे गेल्या एक लाख नोकऱ्या! २१८ कंपन्यांत कर्मचारी कपात; भारतीय IT क्षेत्रही हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:41 IST

एआय, क्लाउड आणि नफ्याच्या शर्यतीत कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा बळी; लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरकपातीची लाट उसळली असून २०२५ मध्ये आतापर्यंत तब्बल एक लाखांहून अधिक कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. लेऑफ्स. एफ.वाय.आय या संकेतस्थळाच्या आकडेवारीनुसार २१८ कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. सिलीकोन व्हॅलीपासून ते बेंगळुरूपर्यंत सर्वच ठिकाणी कंपन्या आपल्या मनुष्यबळात कपात करत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), क्लाउड सेवा आणि नफ्याच्या दिशेने नव्याने लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट या कंपन्यांनी ठेवल्याने लाखो कर्मचाऱ्यांना फटका बसत आहे.

तंत्रज्ञानाबरोबरच इतर उद्योगही यामध्ये मागे नाहीत. यूपीएसने आपल्या इतिहासातील सर्वात मोठी कपात जाहीर केली आहे. कंपनीतून ४८,००० कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येणार आहे. फोर्ड मोटर्स कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे.

सर्वात मोठी नोकरकपात कुठे झाली? कंपन्या असे का करताहेत?

चिपनिर्मिती क्षेत्रातील दिग्गज इंटेलने या वर्षातील सर्वात मोठी कपात केली आहे. कंपनीने २४,००० पदे कमी केली असून हे तिच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास २२ टक्के आहेत. अमेरिकेसह जर्मनी, पोलंड आणि कोस्टारिका येथील कारखान्यांवर या कपातीचा परिणाम झाला आहे.

एनव्हिडिया आणि एएमडीसारख्या स्पर्धक कंपन्यांशी सामना करण्यासाठी इंटेल ही पुनर्रचना करत आहे. ॲमेझॉननेही १४,००० हून अधिक कॉर्पोरेट पदे कमी केली आहेत. कंपनीचे सीईओ अँडी जस्सी यांनी सांगितले की, कंपनी कार्यपद्धती अधिक सुटसुटीत करण्याचा प्रयत्न करतेय.

भारतीय ‘आयटी’लाही फटका

भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने जुलै–सप्टेंबर २०२५ दरम्यान तब्बल २०,००० कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. इतर भारतीय आयटी कंपन्याही भरतीबाबत सावध आहेत. ऑटोमेशनमुळे मध्यम स्तरावरील पदांवर मनुष्यबळाची गरज कमी होत आहे.

मायक्रोसॉफ्ट, गूगल, मेटाही मागे नाहीत : मायक्रोसॉफ्टने या वर्षी सुमारे ९,००० कर्मचारी कमी केले आहेत. गुगल आणि मेटा (फेसबुकची मूळ कंपनी) यांनीही कपातीचे निर्णय घेतले आहेत. ऑरॅकलनेही अमेरिकेत शेकडो कर्मचाऱ्यांना कमी केले आहे आणि एआय-आधारित क्लाउड प्लॅटफॉर्मकडे लक्ष केंद्रित केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : AI Triggers 100,000 Job Losses; Indian IT Sector Shaken

Web Summary : A global tech layoff wave, fueled by AI and cloud focus, has resulted in over 100,000 job cuts across 218 companies. Major firms like TCS, Intel, Amazon, Microsoft, and UPS are reducing workforce, impacting even the Indian IT sector significantly due to automation.
टॅग्स :आर्टिफिशिअल इंटेलिजन्सनोकरी