Join us
Daily Top 2Weekly Top 5

"वृत्त पाहिल्यानंतर वडिलांना...," Byju's चे संस्थापक बायजू रविंद्रन यांचं कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 09:34 IST

एडटेक कंपनी बायजूस सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यातही कंपनीला अडचणी येत असल्याची माहिती समोर आली होती

Byju's Crisis: एडटेक कंपनी बायजूस सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दरम्यान, बायजूसचे संस्थापक आणि सीईओ बायजू रविंद्रन यांनी एक भावनिक पत्र शेअर केलं आहे. जानेवारीचे सर्व प्रलंबित पगार जमा झाले आहेत. कंपनीबाबत येत असलेल्या वृत्तांमुळे वडिलांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं त्यांनी सांगितले, बायजू यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. 

"दोन दिवसांपूर्वी, मी माझ्या वडिलांना बातम्या पाहून रडताना पाहिलं. माझे वडील माझे आदर्श आहेत. मी एक शिक्षक आहे कारण तेही एकेकाळी शिक्षक होते. मी एक उद्योजकही आहे कारण त्यांनी मला नेहमी माझ्या स्वप्नांचं अनुसरण करायला शिकवलं. जेव्हा मी त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले, तेव्हा मलाही त्या वेदनांची जाणीव झाली," असं बायजू रविंद्रन यांनी म्हटलंय. 

आव्हानांचा सामना 

कंपनीसमोर अनेक आव्हानं असली तरी चिकाटीनं प्रयत्न करण्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं. या आव्हानांनी मला झटका दिला नाही असं मी म्हणत नाही. उद्योजकांनी दृढ आणि स्थिर राहिलं पाहिजे. खरं तर, वेदना सहन करण्याची आणि शेवटी त्या सर्व वेदनांवर मात करण्याची त्यांच्यात क्षमता असते,” असं बायजू रविंद्रन म्हणाले. 

इतका आहे महिन्याचा खर्च 

कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हावेत यासाठी मोठे प्रयत्न करावे लागल्याचं बायजू यांनी सांगितलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचा मासिक वेतन खर्च सुमारे ७० कोटी रुपये आहे. रविंद्रन यांनी रोखीच्या तुटवड्यामध्ये कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे उभे करण्यासाठी आपलं घर तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीची घरं गहाण ठेवल्याचंही यापूर्वी रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं.

टॅग्स :व्यवसाय