Join us

पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 08:42 IST

भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं नुकतंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) कर्ज घेतलं. आता आयएमएफ भारताच्या आणखी एका शेजाऱ्याला १.३ अब्ज डॉलरचं कर्ज देणार आहे.

भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं नुकतंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) कर्ज घेतलं. आता आयएमएफ भारताच्या आणखी एका शेजाऱ्याला १.३ अब्ज डॉलरचं कर्ज देणार आहे. हा देश दुसरा कोणी नसून बांगलादेश आहे. आयएमएफ जूनमध्ये बांगलादेशला १.३ अब्ज डॉलर्स देणार आहे, अशी माहिती त्यांच्या अर्थ मंत्रालयानं दिली. भारतानं ४.७ अब्ज डॉलरच्या कर्ज कार्यक्रमाचा चौथा आढावा पूर्ण केल्यानंतर आणि सुधारणांच्या वाटाघाटींमध्ये यश मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलंय. 

रखडलेलं कर्ज फेडण्यासाठी बांगलादेशनं बुधवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बाजारनिर्धारित विनिमय दराच्या अटी मान्य केल्या. बांगलादेश बँकेचे गव्हर्नर अहसान एच. मन्सूर यांनी आयएमएफच्या अटींची पूर्तता करण्यासाठी तात्काळ फ्लोटिंग एक्स्चेंज रेटची घोषणा केली, ज्यामुळे कर्जाची पुष्टी सुनिश्चित होण्यास मदत झाली. बांगलादेशला जूनपर्यंत जागतिक बँक, एडीबी (एशियन डेव्हलपमेंट बँक) आणि आयएमएफसह विविध संस्थांकडून एकूण ३.५ अब्ज डॉलर्स मिळतील, असं त्यांनी दुबईहून व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितलं. विनिमय दरातील लवचिकतेबाबत मतभेद दूर करण्यासाठी अनेक महिन्यांच्या वाटाघाटींनंतर आयएमएफनं जूनपर्यंत कर्जाचा रखडलेला चौथा आणि पाचवा हप्ता देण्यास सहमती दर्शविली आहे, अशी माहिती मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या घोषणेचा अर्थ आतापर्यंत लागू केलेली अंशतः लवचिक प्रणाली सोडून "बाजार-आधारित" विनिमय दर व्यवस्था स्वीकारली जाईल. परंतु, बांगलादेश बँकेनं या प्रणालीबद्दल तपशीलवार माहिती दिली नाही, परंतु विनिमय दर स्थिर करण्यासाठी ५०० दशलक्ष डॉलर्सचा स्थिरीकरण निधी विकसित केल्याचं सांगितलं. बँकांना बाजाराशी संबंधित विनिमय दरांबद्दल आधीच माहिती देण्यात आली होती, परंतु दर स्थिर ठेवण्यासाठी मोठ्या परकीय देयकांच्या बाबतीत बांगलादेश बँक हस्तक्षेप करणार असल्याचं मन्सूर म्हणाले. आयएमएफनं जूनमध्ये ४.७ अब्ज डॉलरच्या कर्ज पॅकेजपैकी १.३ अब्ज डॉलर्स देण्यास सहमती दर्शविली आहे, जी आतापर्यंत काही कारणास्तव रखडली होती.

टॅग्स :बांगलादेशपाकिस्तानअर्थव्यवस्था