Join us

साडेपाच महिन्यांनंतर सोने पुन्हा ६२ हजार पार; आज ६०० रुपयांची वाढ, चांदीही ८०० रुपयांनी वधारली

By विजय.सैतवाल | Updated: October 28, 2023 17:30 IST

अमेरिकन डॉलरचे दर वधारल्याने ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जळगाव : सोने-चांदीच्या भावातील चढ-उतार सुरूच असून शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या भावात एकाच दिवसात ६०० रुपयांची वाढ होऊन ते ६२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. मे महिन्यानंतर सोने पुन्हा एकदा ६२ हजारांच्या पुढे गेले आहे. चांदीच्याही भावात शनिवारी ८०० रुपयांची वाढ झाली व ती ७३ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली. अमेरिकन डॉलरचे दर वधारल्याने ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

विजयादशमीच्या पूर्वीपासूनच सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू आहे. त्यात गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या भावात ५०० रुपयांची वाढ झाली मात्र शुक्रवारी पुन्हा २०० रुपयांची घसरण होऊन ते ६१ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. मात्र शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी त्यात थेट ६०० रुपयांची वाढ झाली व ते ६२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले.

यापूर्वी ५ मे २०२३ रोजी सोने ६२ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर होते. त्यानंतर मात्र त्याचे भाव कमी झाले होते. आता पुन्हा एकदा भाववाढ होऊन साडेपाच महिन्यांनंतर सोने ६२ हजारांच्या पुढे गेले. दुसरीकडे चांदीच्याही भावात शनिवारी ८०० रुपयांची वाढ झाल्याने ती तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा ७३ हजारांवर पोहचली. शनिवारी अमेरिकन डॉलरचे दर वाढून ८३.४१ रुपयांवर पोहचले. त्यामुळे सोने-चांदीच्याही भावात वाढ झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :सोनं