Join us  

अर्थसंकल्पानंतर बाजारात घसरगुंडी; गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 3:09 AM

सुपर रिच टॅक्समुळे विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा जोरदार मारा

मुंबई : वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अतिश्रीमंतांवर अतिरिक्त कर (सुपर रिच टॅक्स) लावल्यामुळे विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआय) शेअर बाजारात विक्रीचा जोरदार मारा केला असून आतापर्यंत बाजारात झालेल्या घसरगुंडीमुळे गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे सरासरी बाजार भांडवली मूल्य (मार्केट कॅपिटलायझेशन) ५ जुलै रोजी १५१.३५ लाख कोटी होते. १९ जुलै रोजी ते घसरून १४५.३४ लाख कोटींवर आले. सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात ६.0१ लाख कोटींची घट झाल्याचे यातून दिसते.

इंडियाबुल्स व्हेंचर्स लि.च्या संचालिका फोराम पारेख म्हणाल्या की, अतिश्रीमंत कराचा एफपीआय, एचएनआय आणि यूएचएनआय यांना थेट फटका बसणार आहे. अतिरिक्त कर लावतानाच आधीचे अतिरिक्त कर रद्द करण्याबाबत कोणत्याही योजना सरकारकडे नाहीत. या कराची घोषणा झाल्यानंतर विदेशी संस्थांनी शेअर बाजारातील आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे बाजार खाली आले आहेत.

पारेख यांनी म्हटले की, यावर सरकारने कोणतीही उपाय योजना न केल्यास आगामी काही दिवसांत समभागांची आणखी भीषण विक्री एफआयआयकडून होईल. मागणी वाढण्याची चिन्हेही दिसून येत नाहीत. त्यामुळे कंपन्यांची मिळकत घटत आहे. ताज्या डाटानुसार, १ जुलै ते १९ जुलै या काळात ७,७१२.१२ कोटी रुपये गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून काढून घेतले. याच काळात विदेशी गुंतवणूकदारांनी ऋण श्रेणीत ९,३७१.१२ कोटी रुपये गुंतविले. यातून असे दिसून येते की, जुलैमध्ये आतापर्यंत भांडवली बाजारात १,६५९ कोटी रुपयांची शुद्ध गुंतवणूक केली. ही गुंतवणूक समभाग आणि रोखे अशा दोन्ही स्वरूपातील आहे.दीर्घ कालीन गुंतवणूकदारांसाठी उत्तम संधीविक्रीच्या माऱ्यामुळे निफ्टी ११,४०० च्या खाली घसरला आहे. तो २०० दिवसांच्या सरासरीच्या दिशेने म्हणजेच ११,१२७ अंकांच्या दिशेने घसरत आहे. अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजचे एमडी व सीईओ अरुण ठकुराल यांनी सांगितले की, ही घसरण दीर्घ कालिन गुंतवणूकदारांसाठी संधी आहे. तीन वर्षे व त्यापेक्षा जास्त काळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ खरेदीसाठी योग्य आहे.

टॅग्स :शेअर बाजारअर्थसंकल्प 2019