Join us  

"बिझनेस प्लॅनसाठी पुरेसा फंड," संकटाचा सामना करत असलेल्या अदानी समूहाकडून पुन्हा स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 10:24 PM

सोमवारी अदानी समूहानं पुन्हा एकदा स्पष्टीकरण देत सर्व कंपन्यांची बॅलन्स शीट उत्तम असल्याचं म्हटलंय.

हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूहाच्या सर्वच कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. या रिपोर्टमध्ये अदानी समूहावरील कंपन्यांवर आरोप करण्यात आले आहेत. अदानी समूहाकडून हे आरोप फेटाळण्यातही आले होते. दरम्यान, सोमवारी अदानी समूहानं पुन्हा एकदा स्पष्टीकरण देत सर्व कंपन्यांची बॅलन्स शीट उत्तम असल्याचं म्हटलंय. या शिवाय त्यांच्याकडे कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा मजबूत पाया आहे आणि त्यांचे असेट्सही सुरक्षित आहेत, असं अदानी समूहाकडून सांगण्यात आलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार अदानी समूहाने आपल्या महसूलाच्या वाढीचं लक्ष्य निम्म्यावर आणलं आहे आणि ते कॅपिटस एक्सपेंडिचरशी निगडीत नव्या योजनांना कमी करण्याचेही प्रयत्न करत आहेत.

या अहवालाबाबत विचारले असता, समूहाच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, "अदानी समूहाच्या कंपन्यांकडे कॅश फ्लो मजबूत आहे आणि आमच्या व्यवसाय योजनेसाठी पुरेसा निधी आहे." "सध्याचे बाजार स्थिर झाल्यावर प्रत्येक कंपनी आपल्या भांडवली बाजार धोरणाचे पुनरावलोकन करेल. भागधारकांना उच्च परतावा देण्याच्या आमच्या पोर्टफोलिओच्या निरंतर क्षमतेवर आम्हाला विश्वास आहे," असंही अदानी समूहाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

आर्थिक स्थिरतेवर लक्ष केंद्रितब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अदानी समूहाने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी केवळ अंदाजच कमी केला नाही, तर भांडवली खर्चाच्या योजनांमधील लक्ष्य आता आक्रमक विस्ताराऐवजी आर्थिक स्थिरतेवर असेल. दुसरीकडे, अदानी समूहाच्या कंपन्यांचे बाजारमूल्य घसरल्यानं मूडीजनं अदानी ग्रीनसह चार कंपन्यांचा आउटलूक डाऊनग्रेड केला आहे.

विक्रीचा दबावअमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांवर विक्रीचा दबाव आहे. हिंडेनबर्गनं अदानी समूहावर स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फसवणुकीचा आरोप केला आहे. तेव्हापासून अदानी समूहाच्या कंपन्यांवर विक्रीचा दबाव आहे. मात्र, अदानी समूहानं हिंडेनबर्गचे आरोप फेटाळून लावले आहेत.

टॅग्स :गौतम अदानीव्यवसायशेअर बाजार