Join us  

अदानींच्या या कंपनीची जोरदार मुसंडी, मिळवलं टाटा आणि अंबानींच्या क्लबमध्ये स्थान 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 9:01 PM

gautam Adani News: अदानी समूह आता टाटा आणि अंबानी यांच्यासारख्या टॉप कॉर्पोरेट घराण्यांच्या पंक्तीमध्येही दाखल झाला आहे. अदानी समुहाकडे आता एमकॅप दोन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असलेल्या कंपन्यांची संख्या वाढून चार झाली आहे.

मुंबई - देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यावसायिक असलेले गौतम अदानी यांच्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे अदानी यांच्या संपत्तीमध्येही सातत्याने वाढ होत आहे. एवढेच नाही तर अदानी समूह आता टाटा आणि अंबानी यांच्यासारख्या टॉप कॉर्पोरेट घराण्यांच्या पंक्तीमध्येही दाखल झाला आहे. अदानी समुहाकडे आता एमकॅप दोन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असलेल्या कंपन्यांची संख्या वाढून चार झाली आहे.

या पातळीपर्यंत पोहोचणारी अदानी समुहामधील चौथी कंपनी ही अदानी एंटरप्रायझेस आहे. मंगळवारी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वाढून सर्वोच्च पातळीवर पोहोचला. त्याबरोबरच कंपनीचा एमकॅप २ लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. आज दिवसभरात कंपनीचा शेअर एक टक्क्याने घसरला. मात्र तरीही कंपनीचा एमकॅप २ लाख कोटी रुपयांच्या वर राहिला आहे.

अदानी एंटरप्रायझेसचा शेअर २०२१ मध्ये तीन पट अधिक वाढला आहे. यावर्षी आतापर्यंत सुमारे सात टक्क्यांनी वाढला आहे. तत्पूर्वी अदानी समुहाच्या ज्या तीन कंपन्यांनी २ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक एमकॅप बनवले आहे, त्यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी,  अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन यांचा समावेश आहे. आता या चारही कंपन्यांचा एकत्रित एमकॅप १० कोटी रुपयांच्यावर पोहोचला आहे.

सध्या टाटा समुह भारतातील सर्वात मोठे कॉर्पोरेट घराणे आहे. शेअर मार्केटमध्ये सध्या टाटा समुहाच्या एकूण २९ कंपन्या लिस्टेड आहेत. यामध्ये टीसीएस, टायटन आणि टाटा स्टील यांचा देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये समावेश होतो. टीसीएस भारतामधील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. सर्व लिस्टेड कंपन्या मिळून टाटा समुहाचा एमकॅप २४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. दुसऱ्या स्थानांवर मुकेश अंबानी यांचा अंबानी समुह आहे. त्यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड सुमारे १६.५० लाख कोटी रुपये एमकॅपसह दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.  

टॅग्स :अदानीव्यवसायशेअर बाजार