Join us

‘इंटेल’मधील हजारो लोकांवर टांगती तलवार; मंदीचे संकेत : २०% कपातीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 05:54 IST

कंपनीच्या विक्री आणि विपणन विभागातील किमान २० टक्के कर्मचाऱ्यांना काढले जाऊ शकते. जुलैच्या आकडेवारीनुसार, कंपनीमध्ये १,१३,७०० कर्मचारी आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चिप उत्पादक कंपनी इंटेल कॉर्पने मोठी कर्मचारी कपात करण्याची तयारी चालविली आहे. पर्सनल कॉम्प्युटर बाजारात मंदी आल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यात कंपनीच्या काही हजार कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार, याच महिन्यात कर्मचारी कपातीची घोषणा होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या विक्री आणि विपणन विभागातील किमान २० टक्के कर्मचाऱ्यांना काढले जाऊ शकते. जुलैच्या आकडेवारीनुसार, कंपनीमध्ये १,१३,७०० कर्मचारी आहेत.यावर कोणतेही भाष्य करण्याचे इंटेलने नाकारले आहे.  इंटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट गेलसिंगर यांनी मंगळवारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी एक टिपण जारी करून कंपनीच्या बाह्य ग्राहकांसाठी अंतर्गत फाउंड्री मॉडेल तसेच प्रॉडक्ट लाइन निर्माण करण्याची घोषणा केली होती.

हा ठरला चिंतेचा विषयलॉकडाऊनच्या काळात लोकांनी ज्या प्रमाणात पर्सनल कॉम्प्युटरवर खर्च केला होता, त्याप्रमाणात लॉकडाऊन उठल्यानंतरच्या काळात केलेला नाही. त्यामुळे मागणी घटली आहे. त्यातच चीनमधील कोविड-१९ निर्बंध आणि युक्रेन युद्ध यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.

फिचने वर्तविला हाेता अंदाजगेल्या काही महिन्यांपासून युराेप तसेच अमेरिकेतील काही कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीबाबत चर्चा सुरू आहे. फिच या पतमापन संस्थेने युराेझाेन आणि ब्रिटनमध्ये चालू वर्षाअखेरीस मंदीची भीती व्यक्त केली हाेती.  तर अमेरिकेत पुढील वर्षी हलकी मंदी पाहायला मिळू शकते, असा अंदाज वर्तविला हाेता.