Join us

१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 09:57 IST

जगातील आघाडीच्या फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅस्ट्राझेनेकाच्या (AstraZeneca) एका खुलाशानं जगभरात खळबळ उडाली आहे. आपल्या कोरोना लसीमुळे टीटीएससारखे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात, अशी कबुली कंपनीनं दिलीये.

जगातील आघाडीच्या फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅस्ट्राझेनेकाच्या (AstraZeneca) एका खुलाशानं जगभरात खळबळ उडाली आहे. आपल्या कोरोना लसीमुळे टीटीएससारखे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात, अशी कबुली कंपनीनं दिलीये. Thrombosis with Thrombocytopenia Syndrome मुळे शरीरात रक्ताची गुठळी तयार होऊ शकते. या सिंड्रोमनं ग्रस्त असलेल्या व्यक्तीला स्ट्रोक आणि हृदयाच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.  

अॅस्ट्राझेनेकाचा इतिहास १०० वर्षांहून अधिक जुना असला तरी कोरोना काळात ही कंपनी प्रकाशझोतात आली. त्यावेळी कंपनीनं आपली एक लस तयार केली होती. भारतातील अदार पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटनं अॅस्ट्राझेनेकाची कोविशिल्ड (Covishield) लस विकसित केली होती. देशातील अनेक लोकांना ही लस देण्यात आली. 

अशी अस्तित्वात आली कंपनी 

स्वीडनची अॅस्ट्रा एबी आणि ब्रिटनची झेनेका पीएलसी यांच्या मर्जरमधून १९९९ मध्ये अॅस्ट्राझेनेकाची स्थापना झाली. स्वीडनमधील डॉक्टरांच्या एका टीमनं १९१३ मध्ये अॅस्ट्रा एबीची स्थापना केली. झेनेकाची सुरुवात १९२६ मध्ये इंपीरियल केमिकल इंडस्ट्रीज (ICI) या नावानं झाली. बरीच वर्षे ती ब्रिटनच्या आघाडीच्या फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक होती. १९९९ मध्ये या दोन कंपन्यांच्या मर्जरनंतर अॅस्ट्राझेनेकाचा जन्म झाला. त्यानंतर गेल्या २५ वर्षांत कंपनीनं जगभरातील अनेक कंपन्यांचं अधिग्रहण केलं. अॅस्ट्राझेनेका आज जगातील आघाडीच्या फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे मार्केट कॅप २३४.०२ अब्ज डॉलर असून ही जगातील ४७ वी सर्वात मोठी व्हॅल्यूएबल कंपनी आहे. भारतातील सर्वात व्हॅल्यूएबल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज २३९.८७ अब्ज डॉलरसह या यादीत ४५ व्या स्थानावर आहे. 

लसीमुळे मिळाली प्रसिद्धी 

कोरोना काळात अॅस्ट्राझेनेकाला प्रसिद्धी मिळाली. कंपनीनं कोरोनाची लस विकसित केली आहे. भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं कंपनीची लस बनवण्याचा परवाना मिळवला होता. कोविशिल्ड या नावानं कंपनीच्या लसीचं भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आलं. देशाच्या लसीकरण मोहिमेत याचा वापर करण्यात आला. जगातील अनेक देशांमध्ये त्याची निर्यातही करण्यात आली.  

ब्रिटनमध्ये कंपनीच्या लसीविरोधात कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. अनेक कुटुंबांनी लसीचे दुष्परिणाम झाल्याची तक्रार केली होती. त्यापैकी जेमी स्कॉट यांचाही समावेश होता, ज्यांना लस घेतल्यानंतर ब्रेन डॅमेज झालं होतं. अखेर कंपनीनं या लसीचे दुष्परिणाम मान्य केले आहेत.

टॅग्स :कोरोनाची लस