Join us  

Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 2:17 PM

Success Story : देशातील बड्या ब्रँडच्या यादीत निरमाचा समावेश आहे. हा ब्रँड मोठा करण्यामागे कोण आहे हे तुम्हाला माहित आहे का

Success Story : निरमा। वॉशिंग पावडर निरमा..! ही जाहिरात सगळ्यांनाच आठवत असेल. देशातील बड्या ब्रँडच्या यादीत निरमाचा समावेश आहे. हा ब्रँड मोठा करण्यामागे कोण आहे हे तुम्हाला माहित आहे का? निरमाची सुरुवात एका गरीब कुटुंबातून आलेल्या एका व्यक्तीनं केली होती. निरमाचे संस्थापक करसनभाई पटेल यांचा जन्म १९४५ मध्ये गुजरातमधील एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. केवळ पैसे कमावण्यासाठीच नव्हे तर नाव कमावण्यासाठीही त्यांनी लहानपणापासूनच पूर्ण निष्ठेनं काम केलं. 

करसनभाईंचे प्राथमिक शिक्षण पाटण, गुजरात येथे झालं. करसनभाई पटेल यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे आर्थिक समस्यांशी सामना केला. पण त्यांनी हार मानली नाही. महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर करसनभाई पटेल यांनी शासकीय प्रयोगशाळेत तंत्रज्ञ म्हणून काम केलं. सरकारी नोकरी मिळणं हे अनेकांसाठी मोठं यश मिळवल्याप्रमाणे असतं. पण ही कल्पना करसनभाई पटेल यांना कधीच आवडली नाही. 

नोकरीतून खूश नव्हते करसनभाई 

आपण अधिक सन्मान आणि पैसा कमवावा असं त्यांना वाटत होतं. करसनभाई यांना नोकरी मिळाल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारली. परंतु ते यातून खूश नव्हते. त्यांना आणखी पुढे जायचं होतं आणि एकदा त्यांनी आपलं ध्येय गाठण्यासाठी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. 

घराच्या मागे पावडर बनवायला सुरुवात 

करसनभाईंचा व्यावसायिक प्रवास १९६९ पासून सुरू झाला. महागडी डिटर्जंट पावडर खरेदी करण्यासाठी सर्वसामान्यांसमोर समस्या येत असल्याचं पटेल यांनी पाहिलं आणि म्हणूनच त्यांनी स्वत:ची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. स्वस्त डिटर्जंट पावडर तयार करण्याच्या उद्देशाने करसनभाई पटेल यांनी आपल्या घराच्या अंगणात डिटर्जंट पावडर तयार करण्यास सुरुवात केली. त्यांनी १५ हजार रुपयांचं कर्ज घेऊन कारखाना सुरू केला. त्यांनी आपल्या ब्रँडला निरमा असं नाव दिलं. 

तीन रुपये किलोदराने विकली डिटर्जंट पावडर 

करसनभाई पटेल यांनी सायकलवरून घरोघरी जाऊन डिटर्जंट पावडर विकण्यास सुरुवात केली. त्याची किंमत तीन रुपये किलो ठेवण्यात आली. परवडणाऱ्या किमतीमुळे विक्रीत तेजी आली. फोर्ब्सनुसार, करसनभाई पटेल यांची संपत्ती मे २०२४ पर्यंत सुमारे ३.३ अब्ज डॉलर (सुमारे २७,५४५ कोटी रुपये) आहे. २०२४ च्या फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत ते ९४९ व्या स्थानावर आहेत. निरमा हे सध्या जगभरातील डिटर्जंट पावडर मार्केटमधील परिचयाचं नाव आहे.

टॅग्स :व्यवसायप्रेरणादायक गोष्टी