लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सणासुदीच्या तोंडावर एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने सध्याची चारस्तरीय जीएसटी प्रणाली सोपी करून दोन टप्प्यांची करण्याचा प्रस्ताव दिला होता. याला मंत्री समुहाने गुरुवारी मान्यता दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे येत्या दसरा-दिवाळीमध्ये अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.
सध्याच्या ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के या चार कर दरांऐवजी, आता केवळ ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच दर असतील. बिहारचे उपमुख्यमंत्री तथा जीएसटी मंत्रिगटाचे संयोजक सम्राट चौधरी यांनी सांगितले की, १२ टक्के आणि २८ टक्केचे दोन कर टप्पे रद्द करण्यास संमती देण्यात आली आहे. यामुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. मात्र, अतिचैनीच्या (अल्ट्रालक्झरी) व 'घातक' (सिन गुइस) वस्तूंवर ४० टक्के कर लावण्याचाही समावेश आहे.
विरोधी पक्षांचे म्हणणे काय?
दरम्यान, विरोधी पक्षशासित राज्यांनी प्रस्तावित सुधारणांमुळे होणारा महसुली तोटा किती असेल आणि तो भरून काढण्यासाठी कोणती यंत्रणा असेल, हे स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. पश्चिम बंगालच्या अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी सांगितले की, नवीन जीएसटी रचना लागू झाल्यावर केंद्र व राज्यांना होणाऱ्या महसुली तोट्याचा उल्लेख केंद्राच्या प्रस्तावात नाही. त्याबाबत स्पष्टता असावी, अशी आमची मागणी आहे.
आता पुढे काय ? : मंत्री समुहात बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान तसेच काँग्रेस, डावे आणि तृणमूल काँग्रेस शासित राज्ये आहेत. या समुहाने केलेल्या शिफारसी आता अंतिम निर्णयासाठी उच्चस्तरीय जीएसटी परिषदेकडे पाठविण्यात येतील.परिषदेच्या मंजुरीनंतर नवीन जीएसटी प्रणाली लागू होईल. ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकेल. परिषदेची ही बैठक सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे.
सर्वसामान्यांसाठी कोणत्या वस्तू होतील स्वस्त?
१२ टक्के ऐवजी ५% जीएसटी कर स्लॅबमध्ये समावेश होण्याची शक्यता असलेल्या वस्तू खालीलप्रमाणे
सुकामेवा, ब्रेडेड नमकीन, टूथ पावडर, टूथपेस्ट, साबण, हेअर ऑइल, सामान्य अँटिबायोटिक्स, पेनकिलर औषधे, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, स्नॅक्स, फ्रोजन भाज्या, कंडेन्स्ड मिल्क, काही मोबाईल आणि कॉम्प्युटर, शिवणकामाचे मशीन, प्रेशर कुकर, गिझर, विजेशिवाय चालणारे पाण्याचे फिल्टर, इलेक्ट्रिक इस्त्री, व्हॅक्यूम क्लिनर, १००० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे तयार कपडे, ५०० ते १००० रुपयांच्या किमतीचे बूट, बहुतांश लसी, एचआयव्ही/टीबी डायग्नोस्टिक किट, सायकल आणि भांडी, कंपास पेटी, नकाशे, ग्लेज्ड टाइल्स, प्री-फॅब्रिकेटेड बिल्डिंग, व्हेंडिंग मशीन, सार्वजनिक वाहतुकीची वाहने, शेतीची यंत्रसामग्री, सोलर वॉटर हिटर.
खालील वस्तूंची २८ ऐवजी १८% स्लॅबमध्ये समावेशाची शक्यता
सिमेंट, सौंदर्य प्रसाधने, चॉकलेट, रेडी-मिक्स काँक्रीट, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, डिशवॉशर, वैयक्तिक विमाने, प्रोटीन कॉन्संट्रेट, साखरेचे सिरप, कॉफी कॉन्संट्रेट, प्लास्टिक उत्पादने, रबरचे टायर, अल्युमिनियम फॉइल, टेम्पर्ड ग्लास, प्रिंटर, रेझर, मॅनिक्युअर किट, डेंटल फ्लॉस.