Join us  

भारतीय कंपन्यांना ९९६ ची कीड, भीषण कार्य संस्कृती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 4:31 AM

चीनमध्ये ९९६ या नावाने ओळखली जाणारी भीषण कार्य संस्कृती भारतातील औद्योगिक क्षेत्रातही सुरू असल्याचे दिसून येत आहे. ९९६ म्हणजे सकाळी ९ ते रात्री ९ आणि आठवड्यातील ६ दिवस काम करणे होय.

नवी दिल्ली : चीनमध्ये ९९६ या नावाने ओळखली जाणारी भीषण कार्य संस्कृती भारतातील औद्योगिक क्षेत्रातही सुरू असल्याचे दिसून येत आहे. ९९६ म्हणजे सकाळी ९ ते रात्री ९ आणि आठवड्यातील ६ दिवस काम करणे होय.बलाढ्य चिनी कंपनी अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांनी अलीकडेच ९९६ कार्यसंस्कृतीचे जोरदार समर्थन केले होते. ‘ओव्हरटाईमची ही कार्य संस्कृती मोठेच वरदान आहे’, असे त्यांनी म्हटले होते.सूत्रांनी सांगितले की, भारतातील स्टार्टअप क्षेत्रात ९९६ कार्य संस्कृती सर्रास दिसून येते. अनेक कंपन्यांत तर कर्मचारी सप्ताहअंतास (विकएंड) आणि सुट्यांतही काम करतात. टिकून राहण्यासाठी ही कार्य संस्कृती आवश्यक असल्याचे अनेक कंपन्यांचे संस्थापक सांगतात. एका बी-टू-बी मार्केट प्लेसच्या संस्थापकाने सांगितले की, टायनी आऊल आणि हाऊसिंग डॉट कॉमच्या अपयशाने आमच्यावर दबाव वाढवला आहे. जेव्हा तुमची कंपनी नवी असते आणि स्पर्धा प्रस्थापितांशी असते, तेव्हा तुम्हाला केवळ तुमच्या उत्पादनांच्या किमती कमी ठेवून चालत नाही; तुम्हाला अधिक कठोरपणे कामही करावे लागते. त्याचप्रमाणे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमीत कमी वेळात काम करून द्यावे लागते. माझ्या अनेक महिला सहकाऱ्यांना मी अनेक वेळा माझ्या गाडीतून रात्री २ अथवा ३ वाजता घरी सोडल्याचे मला आठवते. कारण आम्हाला रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असे. मात्र, त्यांच्या प्रवासासाठी पैसे नसायचे.बिझ दिवाज या संस्थेच्या सीईओ सारिका भट्टाचार्य यांनी सांगितले की, स्टार्टअपप्रमाणेच मोठ्या कंपन्यांतही ९९६ कार्य संस्कृती आढळून येते. आपले औद्योगिक क्षेत्र चीन आणि जपानच्या मार्गाने चालले आहे. खाजगी बँका आणि टेलिकॉम कंपन्यांचे कर्मचारी सकाळी ९ ते रात्री ९ असे १२ तास काम करतात.सारिका भट्टाचार्य यांनी सांगितले की, जास्तीच्या तासांचे काम खरे तर ऐच्छिक असते. त्याचा लाभही कर्मचाऱ्यांना होतो. अधिकचे काम करणाºया कर्मचाºयांना वेगाने पदोन्नत्या मिळतात. आर्थिक लाभही मिळतात. कर्मचारी जर संस्थापक पथकाचे सदस्य असतील तर त्यांना स्टार्टअप कंपनी आणि संस्थापकांबाबत भावनिक आपलेपणा वाटतो. कंपनीला नावारूपाला आणणे हे त्यांचे स्वप्त आणि वेड बनते, अशा परिस्थितीत कामाचे जास्तीचे तास त्यांच्यासाठी बिनमहत्त्वाचे ठरतात. 

टॅग्स :व्यवसायभारत