नवी दिल्ली : मागील दोन महिन्यांत बँकांनी ४.९१ लाख कोटी कर्ज वितरित केले आहे, त्याचप्रमाणे नोव्हेंबर अखेरपर्यंत प्राप्तिकर परताव्याची रक्कम १.४६ लाख कोटीवर गेली आहे. एवढा मोठा पैसा बाजारात आल्यामुळे अर्थव्यवस्थेतील खर्चात वाढ होऊन मंदीतील अर्थव्यवस्थेला गती मिळण्यास मदत होईल, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सणासुदीच्या हंगामाकरिता ग्राहकांसाठी विशेष पुढाकार केला होती. त्यानुसार सरकारी बँकांनी आॅक्टोबरमध्ये २.५२ लाख कोटींची कर्जे वितरित केली. हाच सिलसिला नोव्हेंबरमध्येही पुढे सुरू राहिला. वैयक्तिक व औद्योगिक ग्राहकांना नोव्हेंबरमध्ये २.३९ लाख कोटींची कर्जे वितरित करण्यात आली. याचदरम्यान प्राप्तिकर विभागाकडून करदात्यांना कर परतावे अदा करण्याची मोहीम धडाक्यात राबविण्यात येत होती. २८ नोव्हेंबरपर्यंत प्राप्तिकर विभागाने १.४६ लाख कोटी रुपयांचे कर परतावे अदा केले. मागील वर्षाच्या तुलनेत कर परताव्यात २३ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले, असे वित्त मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.सूत्रांच्या मते, मंदीत असलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजनांत कर्ज वितरण वाढविण्याचा समावेश आहे. गेल्या शुक्रवारी जारी झालेल्या आकडेवारीनुसार ३० सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर घसरून ४.५ टक्क्यांवर आला आहे.दोन महिन्यांत इतकी दिली कर्जेप्राप्त माहितीनुसार, मागील दोन महिन्यांत औद्योगिक व वैयक्तिक ग्राहकांना ४,९१,८३४ कोटी रुपयांचे कर्ज वितरित झाले आहे.त्यातील गृहकर्ज २७,२५४ कोटी, वाहन कर्ज ११,०८८ कोटी, शैक्षणिक कर्ज १,१११ कोटी, कृषी कर्ज ७८,३७४ कोटी रुपये आहे.
५ लाख कोटींचे कर्ज, प्राप्तिकर परताव्यामुळे अर्थव्यवस्थेला गती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 04:20 IST