Join us

४५ वर्षांमध्ये डिझेलच्या दरामध्ये ७८ पटीने झाली वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 07:57 IST

Diesel Price : भारतात १९५५ साली डिझेलचा वापर तसा कमी प्रमाणात होऊ लागला होता. त्यामुळे केवळ २० पैसे लिटर दराने डिझेल मिळत होते. 

- शोभना कांबळे

रत्नागिरी : सध्या प्रति लिटर १०५ रूपयांपर्यंत पोहोचलेले डिझेल,१९७६ साली केवळ १.३४ रूपये प्रति लिटर दराने मिळत होते. तर पेट्रोल ३.४५ रूपये प्रति लिटर दराने मिळत होते. सध्या  पेट्रोलचे दर ११८ रूपयांपर्यंत गेले आहे. म्हणजेच  गेल्या ४५ वर्षांत पेट्रोल दरात जवळपास ३५ पट तर डिझेल दरात ७८ पट वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर गगनाला भिडू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मात्र महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत. भारतात १९५५ साली डिझेलचा वापर तसा कमी प्रमाणात होऊ लागला होता. त्यामुळे केवळ २० पैसे लिटर दराने डिझेल मिळत होते. तब्बल २१ वर्षांनंतर, १९७६ साली डिझेलचा दर १.३४ पैसे झाला तर पेट्रोलचा दर ३.४५ रूपये. त्यावेळी ऑइल होते ९ रूपये लिटर. १९९१ साली पेट्रोलचे दर दोन आकडी म्हणजेच १३.८० रूपये प्रति लिटर झाले आणि डिझेल ५.७४, ऑइलचा दर मात्र वाढत गेला. तो २५ रूपये प्रति लिटर झाला. १९९८ साली डिझेलचे दर तब्बल ३८ वर्षांनी दोन आकडी म्हणजे ११.५६ रूपये झाले. त्यानंतर २०२१ सालात मात्र या इंधनाच्या दरानी उसळी मारली आहे. पेट्रोलने आणि डिझेलने शंभरी ओलांडली आहे. तर ऑइलने द्विशतक केले आहे. 

डिझेलचा मनोरंजक इतिहास  डिझेल इंजिनचा शोध रूडाॅल्फ कार्ल डिझेल या जर्मन शास्त्रज्ञाने लावल्याने त्यांच्या नावावरूनच या इंधनाला डिझेल हे नाव पडले. डिझेल हे पेट्रोल पेक्षा घट्ट असल्याने त्यात साठलेली ऊर्जा ही अधिक असते. त्यामुळे इंधन कमी लागते. परिणामी डिझेलला पेट्रोलपेक्षा ॲव्हरेज अधिक मिळते.  डिझेलचे तांत्रिक नाव हायस्पीड डिझेल (HSD) असे असून ते रूडाॅल्फ डिझेल यांच्याच नावावरून देण्यात आले आहे. डिझेल पेट्रोल पेक्षा कमी ज्वालाग्राही असून उच्च तापमानातही जळत नाही.  त्यामुळे याचा वापर पूर्वीपासून चिलखती वाहने, रणगाडे आणि त्यानंतर मालवाहतुकीचे ट्रक, ट्रॅक्टर यात होऊ लागला. तसेच पेट्रोल पेक्षा ॲव्हरेज अधिक देणारे, प्रदूषण कमी करणारे आणि स्वस्त आहे.

टॅग्स :डिझेलव्यवसाय