Join us

२९ टक्के भारतीय वळले कमी दर्जाच्या खाद्यतेलाकडे, महागाईचा चटका; महिन्याचे बजेट कोलमडल्याने निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 08:12 IST

महागाईच्या झळा सोसणेही असह्य झाले असतानाच तब्बल २९ टक्के भारतीय कमी दर्जाच्या खाद्यतेलाकडे वळल्याची बाब समोर आली आहे.

मुंबई :

महागाईच्या झळा सोसणेही असह्य झाले असतानाच तब्बल २९ टक्के भारतीय कमी दर्जाच्या खाद्यतेलाकडे वळल्याची बाब समोर आली आहे. यात केवळ अल्प उत्पन्न गटातील नव्हे, तर मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांचाही समावेश आहे.

भारतीय स्वयंपाकघरांत प्रामुख्याने सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन, मोहरी, पाम, ऑलिव्ह, तीळ, खोबरेल तेल वापरले जाते. गेल्या ४५ दिवसांत २५ ते ४० टक्क्यांनी दर वाढले आहेत. कोरोना पूर्वकाळात सूर्यफूल तेलाची किंमत ९८ रुपये प्रतिलीटर होती. आजमितीस ती १८० ते २५० रुपयांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे अनेक जण उच्च प्रतीच्या तेलाऐवजी निम्न दर्जाच्या तेलाकडे वळल्याचे ‘लोकल सर्कल’संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशभरातील ३५९ जिल्ह्यांमधील ३६ हजारांहून अधिक नागरिक या सर्वेक्षणात सहभागी झाले.

तेलाचा वापर कमी- ऐरवी फोडणीत तेलाचा भरपूर वापर करणाऱ्या महिलांनी महागाईमुळे दैनंदिन तेल वापरात बऱ्यापैकी कपात केल्याचे समोर आले आहे. - तेल महागल्यापासून २४ टक्के कुटुंबांनी तेलाचा वापर कमी केला, ६७ टक्के नागरिकांनी इतर खर्चातून बचत करून तेलाचा वापर कायम ठेवला, तर २९ टक्के भारतीयांनी कमी दर्जाच्या खाद्य तेलाची निवड केली आहे. 

कोणत्या तेलाला सर्वाधिक पसंती? ९ टक्के खोबरेल तेल२५ टक्के सूर्यफूल तेल १८ टक्के मोहरी तेल २१ टक्के शेंगदाणा तेल 

रशिया-युक्रेनहून आयात1. भारत तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही. आपल्याकडे जवळपास ८५ टक्के सोयाबीन तेल अर्जेंटिना आणि ब्राझिलहून, तर ९० टक्के सूर्यफूल तेल रशिया आणि युक्रेनहून आयात केले जाते. 2. तसेच इंडोनेशिया आणि मलेशियाहून पाम तेल आयात करावे लागते. हवामान बदल, कोरोना महासाथ आणि रशिया-युक्रेनमधील तणावाची स्थिती या दरवाढीस कारणूभूत आहे. 3. तेलाच्या किमती वाढल्याने निम्न दर्जाच्या तेलाकडे वळणे म्हणजे आरोग्याच्या समस्यांना निमंत्रण देण्यासारखे आहे. यामुळे थायरॉइट, आतड्याचा कर्करोग आणि पोटाशी संबंधिक अन्य आजार जडू शकतात, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :तेल शुद्धिकरण प्रकल्प