Join us

सरकारी तिजोरीत आले १९.५८ लाख कोटी रुपये; निव्वळ प्रत्यक्ष करसंकलन १७.७ टक्के वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 06:09 IST

मागच्या वर्षी ३.०९ लाख कोटी इतका रिफंड देण्यात आला. 

नवी दिल्ली : प्रत्यक्ष करांमधून सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नात भरीव वाढ झाली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष करसंकलन वार्षिक आधारावर १७.७ टक्के वाढून १९.५८ लाख कोटींवर पोहोचले. करसंकलनाच्या सुधारित अंदाजापेक्षा मिळालेला कर खूप अधिक आहे, असे कर विभागाने स्पष्ट केले आहे. वाढलेल्या करसंकलनात आयकर आणि कॉर्पोरेट कराचा वाटा सर्वाधिक आहे. 

मागच्या वर्षी निव्वळ प्रत्यक्ष करसंकलनातून १६.६४ लाख कोटी मिळाले. वाढलेल्या करसंकलनातून अर्थव्यवस्थेला मिळालेली गती दिसून येते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०२३-२४ या आर्थिक वर्षात करदात्यांना  ३.७९ लाख कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. हे प्रमाण २०२२-२३ या आर्थिक वर्षात दिलेल्या रिफंडपेक्षा २२.७४ टक्के अधिक आहे. मागच्या वर्षी ३.०९ लाख कोटी इतका रिफंड देण्यात आला. 

व्यक्तिगत करातून किती पैसे? २०२३-२४ या आर्थिक वर्षात सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्ससह (प्रोव्हिजनल) एकूण व्यक्तिगत आयकर करसंकलन १२.०१ लाख कोटी इतके झाले. मागील वर्षीच्या ९.६७ लाख कोटींच्या संकलनापेक्षा हे प्रमाण २४.२६ टक्के अधिक होते. 

टॅग्स :कर