Join us

Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 09:51 IST

ईपीएफओने एक निवेदन जारी केले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये जोडून घेतलेल्या तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची संख्या यात दिली आहे.

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) सप्टेंबर महिन्यात १८.८१ लाख नव्या सभासदांना जोडून घेतले आहे. मागच्या वर्षी याच समान कालावधीच्या तुलनेत ही सभासदसंख्या ९.३३ टक्के अधिक आहे. देशातील एकूणच संघटित क्षेत्रात नोकऱ्या वाढल्याचे यातून अधोरेखित होत आहे. 

देशात नियमित वेतनावर कार्यरत  कर्मचाऱ्यांच्या संख्येची नोंद ईपीएफओच्यावतीने ठेवली जात असते. ईपीएफओने सप्टेंबरमध्ये ९.४७ लाख नवे सदस्य जोडले. सप्टेंबर २०२३ च्या तुलनेत यात ६.२२ टक्के वाढ झाली आहे. देशात रोजगारांच्या संधीमध्ये झालेली वाढ, सोयीसुविधांबाबत कर्मचारी वर्गामध्ये जागरूकता, ईपीएफओकडून केला जात असलेला प्रचार यामुळे ही नोंदणी वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.

सर्वाधिक रोजगार कोणत्या वयोगटात?

ईपीएफओने एक निवेदन जारी केले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये जोडून घेतलेल्या तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची संख्या यात दिली आहे. सामाजिक सुरक्षा योजनेतून या महिन्यात एकूण १८.८१ लाख कर्मचारी सभासद जोडले गेले आहेत.

जोडल्या गेलेल्या सभासदांमध्ये १८ ते २५ या वयोगटातील कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक ५९.९५ टक्के इतकी आहे. या वयोगटातील ८.३६ टक्के सभासद सप्टेंबरमध्ये जोडले गेले. सप्टेंबर २०२३ मध्ये हे प्रमाण ९.१४ टक्के होते. 

२.४६ लाख महिलांना संधी 

सप्टेंबरमध्ये तब्बल २.४७ लाख महिलांना ईपीएफओमध्ये नवे सदस्य म्हणून जोडून घेतल्याची माहिती ईपीएफओने दिली. महिलां कर्मचाऱ्यांमध्ये ९.११ टक्के इतकी वाढ झाली आहे. 

महाराष्ट्र पहिल्या स्थानी

ईपीएफओने जारी केलेल्या राज्यनिहाय आकडेवारीचे विश्लेषण केले असता नवे सदस्य जोडण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे. 

सप्टेंबरमध्ये जोडून घेतलेल्या नव्या सदस्यांमध्ये २१.२० टक्के जण महाराष्ट्रातील होते.

कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, हरयाणा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि तेलंगणामध्येही सरासरी पाच टक्केपेक्षा अधिक सदस्य जोडून घेतले आहेत.

टॅग्स :केंद्र सरकारबेरोजगारीनोकरी