Join us

१४ दिवस, ३७ ट्रान्झॅक्शन्स आणि Axis बँकेच्या स्टाफनं CRED लावला १२.५ कोटींचा चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 15:57 IST

Cred Fraud Case : देशातील सुमारे २० टक्के क्रेडिट कार्डची रक्कम क्रेड या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भरली जाते. या क्रेडच्या बाबतीत काही दिवसांपूर्वी फसवणुकीचा प्रकार घडला. सायबर गुन्हेगारांच्या एका ग्रूपने काही दिवसांपूर्वी त्यांच्या खात्यातून साडेबारा कोटी रुपये काढले.

क्रेडिट कार्ड पेमेंट प्लॅटफॉर्म क्रेडबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. २०१८ मध्ये कुणाल शहा यांनी ड्रीम प्लगपे टेक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या नावानं बंगळुरूमध्ये याची सुरुवात केली होती. सध्या कंपनीचे जवळपास ६० लाख युजर्स आहेत. देशातील सुमारे २० टक्के क्रेडिट कार्डची रक्कम प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भरली जाते. या क्रेडच्या बाबतीत काही दिवसांपूर्वी फसवणुकीचा प्रकार घडला. सायबर गुन्हेगारांच्या एका ग्रूपने काही दिवसांपूर्वी त्यांच्या खात्यातून साडेबारा कोटी रुपये काढले.

कसं सजमलं?

टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना गेल्या नोव्हेंबर महिन्यातील आहे. क्रेडचे अधिकारी नियमितपणे बँक खात्यांची माहिती घेत होते. तेव्हा त्यांना साडेबारा कोटींचा हिशेब दिसला नाही. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर २९ ऑक्टोबर २०२४ ते ११ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत १७ अनधिकृत व्यवहार झाल्याचं उघडकीस आलं. या व्यवहारातून साडेबारा कोटी रुपयांची रक्कम संशयास्पद खात्यात वर्ग करण्यात आली. त्यानंतर या घटनेची माहिती अॅक्सिस बँक आणि पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांना काय माहिती मिळाली?

बंगळुरूच्या ईस्ट सीईएन क्राईम पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली. या प्रकरणात अॅक्सिस बँकेच्या अंकलेश्वर शाखेचा सहभाग असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या फसवणुकीच्या घटनेचा सूत्रधार गुजरातमधील अॅक्सिस बँकेचा रिलेशनशिप मॅनेजर वैभव पिताडिया (३३) असल्याचं समोर आलं. क्रेडच्या कॉर्पोरेट खात्यातील त्रुटींचा गैरफायदा घेण्यासाठी त्यांच्या अंतर्गत माहितीचा वापर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अॅक्सिस बँकेच्या बंगळुरू येथील इंदिरानगर शाखेत चालणाऱ्या क्रेडच्या खात्यात दररोज दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार होतात.

कशी झाली फसवणूक?

ड्रीम प्लगपे टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत क्रेडच्या नोडल खात्याशी संबंधित दोन निष्क्रिय कॉर्पोरेट खात्यांची आरोपींनी ओळख पटविल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. ते अॅक्टिव्हेट करण्यासाठी बोर्डाच्या ठरावांसह बनावट कागदपत्रांचा वापर करून नेहा बेनला एमडी म्हणून ओळख करून दिली. अॅक्सिस बँकेला या खात्यांमध्ये बदल करण्याची विनंती करण्यात आली होती. तिनं गुजरातमधील अॅक्सिस बँकेच्या अंकलेश्वर शाखेत बनावट कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंग (सीआयबी) फॉर्म आणि सहाय्यक कागदपत्रं सादर केली, ज्यामुळे अपडेटेड कॉन्टॅक्ट डिटेल्ससह नवी युझर खातं तयार करण्यास मदत झाली.

नवी क्रेडेन्शिअल्स बनवली

नव्या क्रेडेन्शिअल्सच्या मदतीनं गुन्हेगारांनी अनेक अनधिकृत व्यवहार केले. चोरीचे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पिताडिया यांनं शैलेश आणि शुभम या दोन साथीदारांना आणले, ज्यांनी बनावट कागदपत्रे तयार केली आणि पैसे ट्रान्सफर करण्यासाठी खाती उघडली. त्यानंतर १४ दिवसांत ३७ व्यवहार झाले. यात क्रेडच्या खात्यातून साडेबारा कोटी रुपये गायब झाले.

बनावट एमडीच्या अटकेनंतर खुलासा

बनावट फॉर्म सादर करणाऱ्या नेहाला पोलिसांनी २१ डिसेंबर रोजी अटक केली. चौकशीदरम्यान तिनं पिताडिया आणि इतरांचा सहभाग असल्याचं सांगितलं. चोरीच्या रकमेतून आतापर्यंत १ कोटी ८३ लाख रुपये वसूल करण्यात यश आलं आहे. उर्वरित रक्कम वसूल करून यात सहभागी असलेल्या अन्य साथीदारांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

टॅग्स :सायबर क्राइम