Join us

१२ लाख लोकांना हवी वाढीव पेन्शन; लाभ घेण्यासाठी २६ जूनपर्यंत मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 10:17 IST

भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सदस्यांना वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत २६ जूनपर्यंत वाढविली आहे.

नवी दिल्ली : भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सदस्यांना वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत २६ जूनपर्यंत वाढविली आहे. दरम्यान, वाढीव पेन्शनसाठी संघटनेला आतापर्यंत १२ लाख अर्ज मिळाले आहेत. वाढीव पेन्शन योजनेचा पर्याय निवडल्यास निवृत्तीनंतर मिळणारी एकमुस्त रक्कम घटेल. मात्र, पेन्शनची रक्कम वाढणार आहे.

वाढीव पेन्शन म्हणजे काय हे समजून घेण्याआधी भविष्य निधीबद्दल (ईपीएफ) समजून घेऊ या.

वापरा ही सेवा, स्वस्तात घरपाेच मिळवा जेवण, सरकारी प्लॅटफॉर्म देतेय खासगी कंपन्यांना टक्कर

ईपीएफओ सदस्यांची २ खाती असतात.

१) कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ)

२) कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस)

कर्मचाऱ्याच्या दरमहा वेतनातून १२ टक्के रक्कम कापून ईपीएफमध्ये जमा होते. कंपनीच्या १२ टक्के कपातीचा मोठा हिस्सा ईपीएफमध्ये, तर एक हिस्सा ईपीएसमध्ये जातो.

१६ नोव्हेंबर १९९५ रोजी ईपीएस-९५ ही योजना लागू झाली. १ सप्टेंबर २०१४ पर्यंत ईपीएसमध्ये योगदानासाठी ५,००० ते ६,५०० रुपयांची मर्यादा होती. ती वाढवून १५ हजार करण्यात आली.

२००१ पर्यंत पेन्शन मर्यादा

५ हजार होती. ईपीएसमध्ये ४१७ रुपये जात होते.

ऑक्टोबर २००१ ते ऑगस्ट २०१४ या काळात मर्यादा ६,५०० रुपये होती. त्यानुसार ईपीएसमध्ये ५४१ रुपये जात होते. १ सप्टेंबर २०१४ पासून मर्यादा १५ हजार करण्यात आली. ईपीएसमध्ये कमाल १,२५० रुपये जाऊ लागले.

वाढीव पेन्शन काय आहे?

ईपीएफओ सदस्यांना आपले पेन्शन योगदान पूर्ण वेतनाच्या ८.३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची अनुमती देण्यात आली. त्यामुळे त्यांना वाढीव पेन्शनची संधी मिळाली. १ सप्टेंबर २०१४ रोजी नियमांत बदल करण्यात आला.

ईपीएफओच्या सर्व सदस्यांना वाढीव पेन्शनची संधी देण्यात आली. सुरूवातीला २८ फेब्रुवारी २०१५ पर्यंतची मुदत होती. या मुदतीची अनेक कर्मचाऱ्यांना कल्पना नव्हती.

वाढीव पेन्शनसाठी असा करा अर्ज

ई-सेवा पोर्टलवर जा. उजव्या बाजूचा ‘पेन्शन ऑन हायर सॅलरी’ पर्याय निवडा.

नवे पान उघडून २ पर्याय येतील. १ सप्टेंबर २०१४ पूर्वी निवृत्त झालेल्यांनी पहिला, तर नोकरीत असलेल्यांनी दुसरा पर्याय निवडावा.

यूएएन, नाव, जन्मतारीख, आधार, मोबाइल क्रमांक इत्यादी तपशील भरा.

आधार लिंक्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. तो भरला की प्रक्रिया पूर्ण होईल.

टॅग्स :निवृत्ती वेतनव्यवसाय