Join us

कर्मचाऱ्यांना ११७ काेटी, लढाईला अखेर यश; मायक्राेसाॅफ्टला घ्यावी लागली माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 06:34 IST

अनेक कर्मचाऱ्यांना वेतनवाढच मिळाली नाही. अनेकांना पदोन्नतीपासून वंचित राहावे लागले.

सॅन फ्रान्सिस्को : सुट्टी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत भेदभाव केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या खटल्यात तडजोड करण्याची तयारी मायक्रोसॉफ्ट काॅर्पने दर्शवली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना १.४४ कोटी डॉलर म्हणजेच सुमारे ११७ कोटी रुपये देण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे. 

कॅलिफोर्नियाच्या नागरिकाधिकार विभागाने (सीआरडी) बुधवारी या वृत्ताला दुजोरा दिला. याप्रकरणी कॅलिफोर्निया सरकारच्या तपास संस्थांनी २०२० मध्ये चौकशी सुरू केली होती. सांता क्लारा काउंटीच्या न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर कंपनीने पैसे देण्याची तयारी दर्शवली आहे. 

काय आहे प्रकरण?ज्या कर्मचाऱ्यांनी गरोदरपण, दिव्यांगता, आजार आणि परिवारातील सदस्याची देखभाल या कारणांसाठी सुट्या घेतल्या होत्या, त्या कर्मचाऱ्यांना कंपनीने कमी बोनस दिला. त्याचप्रमाणे आढाव्याच्या वेळेस त्यांना निम्नस्तरावर दाखविण्यात आले. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना वेतनवाढच मिळाली नाही. अनेकांना पदोन्नतीपासून वंचित राहावे लागले.

मायक्रोसॉफ्टचे कर्मचारी किती?मायक्रोसॉफ्ट कॉर्पमध्ये जगभरात सुमारे २,२१,००० कर्मचारी काम करतात. त्यात कॅलिफोर्नियात कर्मचाऱ्यांची संख्या ७ हजार आहे.