Join us

'Shark Tank India 3'मध्ये नंबर १ च्या दाव्यावरुन वाद, सोनी आणि स्पर्धकांना १०० कोटींची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 15:48 IST

३० जानेवारी २०२४ रोजी प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये दावे करण्यात आल्यानंतर हा वाद निर्माण झाला.

'द क्रिकेटर बॅट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ काश्मीर' म्हणजेच CBMAK नं सोनी पिक्चर्स नेटवर्क आणि प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'शार्क टँक इंडिया'मध्ये दिसलेल्या ट्रॅम्बू स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध केस करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० जानेवारी २०२४ रोजी प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये दावे करण्यात आल्यानंतर हा वाद निर्माण झाला आणि तो खोटा असल्याचं सांगण्यात आलं. CBMAK नं यासंदर्भात १०० कोटी रुपयांची कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. 

काश्मीर खोऱ्यातील क्रिकेट बॅट तयार करणाऱ्यांची संस्था CBMAK च्या एका टीमनं ट्रॅम्बू बंधूंच्या दाव्याचं खंडन केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी शोमध्ये स्वतःला काश्मीरमधील एकमेव बॅट उत्पादक म्हणून वर्णन केले आहे. ट्रॅम्बू ब्रदर्सनं लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप संघटनेनं न्यूज पोर्टल Kashmir.com शी केलेल्या विशेष संवादात केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर खोऱ्यातील कारागिरांच्या कामावरही परिणाम झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.'ट्रॅम्बी स्पोर्टचा चुकीचा दावा' 

'आज तक डॉट कॉम'च्या वृत्तानुसार, सीबीएमएकेचे अध्यक्ष फयाद अहमद दार आणि उपाध्यक्ष फवाझुल कबीर आणि इतर सदस्यांनी 'ट्रॅम्बू काश्मीर विलो क्रिकेट बॅट'चे प्रतिनिधीत्व करणाऱ्या स्पर्धक हमद आणि साद यांचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं आहे आणि यावर त्यांनी प्रतिक्रियाही दिली.रिपोर्टनुसार, 'ट्रॅम्बू काश्मीर विलो क्रिकेट बॅट' ही कंपनी हमाद आणि साद सांभाळतात. त्याच्या हाती या कंपनीची धुरा आहे. त्यांनी फंडिंगसाठी 'शार्क टँक'ची मदत घेतली आणि तेथे जाऊन असा दावा केला, जो चुकीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. 

सीबीएमएकेनं सोनीकडून १५ दिवसांत स्पष्टीकरण मागितलं आहे आणि माफीही मागण्यास सांगितलंय. असोसिएशनने म्हटलंय की, 'चॅनलने मुदतीच्या आत माफी मागितली नाही तर १०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल.' ट्रॅम्बू स्पोर्ट्स क्रिकेट बॅट बनवण्याचं काम करत नाही. उलट तो विलो बॅटचा स्टॉकिस्ट आणि डीलर असल्याचं सीबीएमएकेनं म्हटलंय.

टॅग्स :व्यवसायजम्मू-काश्मीर