Join us
Daily Top 2Weekly Top 5

रामलला प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर देशभरात 1.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय, काय-काय विकलं गेलं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 19:03 IST

हा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा आहे.

अयोध्येत बांधण्यात आलेल्या प्रभू रामचंद्रांच्या भव्य दिव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा समारंभानंतर रामलला विराजमान झाले आहेत. या कार्यक्रमामुळे देशातील अर्थव्यवस्थेला एक नवा अध्याय जोडला गेला आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशभरात जवळपास 1.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाल्याचा अंदाज आहे. यांपैकी एकट्या दिल्लीत 25 हजार कोटी रुपये, तर उत्तर प्रदेशात जवळपास 40 हजार कोटी रुपयांच्या वस्तू तथा सेवांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. हा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा आहे.

भक्तीने व्यापार वाढला - यासंदर्भात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटले आहे की, श्रद्धा आणि भक्तीमुळे एवढा मोठा पैसा व्यापाराच्या माध्यमाने देशाच्या बाजारपेठेत येण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे हा सर्व व्यापार छोटे व्यापारी आणि छोट्या उद्योजकांनी केला. यामुळे आलेल्या पैशांमुळे व्यवसायात आर्थिक तरलता वाढेल.

रोजगाराच्या नव्या संधी -खंडेलवाल म्हणाले, राम मंदिरामुळे देशात नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. याचबरोबर लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही मिळेल. आता व्यवसायिक आणि स्टार्टअप्सने व्यापारात नवे आयाम जोडण्याचा प्रयत्न करायला हवा.

काय काय विकलं गेलं -कॅटच्या मते, देश भरात गेल्या काही दिवसांत राम मंदिराचे कोट्यवधी मॉडेल विकले गेले, याशिवाय, माळा, लटकन, बांगड्या, टिकल्या, कडे, राम ध्वज, राम फेटे, राम टोप्या, प्रभू रामचंद्रांचे चित्र, राम दरबाराची चित्रे, राम मंदिराची चित्रे आदींची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. या काळात देशभरातील पंडित अथवा ब्राह्मण मंडळींचीही मोठ्या प्रमाणावर कमाई झाली. कोट्यवधींची मिठाई आणि ड्राय फ्रूट्स प्रसादाच्या स्वरुपात विकले गेले. हे सर्व भाविकांनी श्रद्धा आणि भक्ती पोटी केले. देशात असे वातावरण यापूर्वी कधीच बघायला मिळाले नाही. देशभरात कोट्यवधींचे फटाके, मातीचे दिवे, तसेच इतर वस्तूंपासून तयार करण्यात आलेल्या दिव्यांचीही जबरदस्त विक्री झाली.

टॅग्स :राम मंदिरअयोध्याव्यवसाय