Zerodha Investment Scheme : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड (Motilal Oswal Mutual Fund) आणि झिरोदा म्युच्युअल फंड (Zerodha Mutual Fund) यांनी आपल्या योजनांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. मोतीलाल ओसवाल यांनी आपल्या अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडाचे बेंचमार्क बदलण्याचा निर्णय घेतलाय, तर झिरोदानं गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंड्ससाठी (FOF) किमान गुंतवणूक (Minimum Investment) आणि एसआयपीची (SIP) रक्कम कमी केली आहे. या बदलांमुळे गुंतवणूकदारांसाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. याशिवाय एसबीआय, बडोदा बीएनपी परिबा आणि एडलवाइज सारख्या प्रमुख फंड हाऊसेसनी आयटी, एनर्जी आणि कन्झुमर क्षेत्रात गुंतवणुकीच्या चांगल्या संधी देणाऱ्या नवीन फंड ऑफर्स (एनएफओ) सुरू केल्या आहेत.
मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने आपल्या मोतीलाल ओसवाल अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडाचा बेंचमार्क बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हा फंड क्रिसिल अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड बी-आय इंडेक्सनुसार चालत होता, परंतु आता तो क्रिसिल अल्ट्रा शॉर्ट टर्म डेट ए-आय इंडेक्सवर (AI Index) आधारित असेल. हा बदल ३१ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहे. बेंचमार्क हे कामगिरीचं मोजमाप आहे जे फंडाच्या कामगिरीची तुलना करण्यास मदत करते.
दुसरीकडे, झिरोदा म्युच्युअल फंडाने आपल्या झिरोधा गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंड्स (एफओएफ) साठी किमान गुंतवणूक आणि एसआयपीची रक्कम कमी केली आहे. आता गुंतवणूकदार या फंडात केवळ १०० रुपयांत गुंतवणूक करू शकतात (पूर्वी ते ५०० रुपये होते). हा बदल ३ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होणार आहे. कमी रकमेतून गुंतवणूक सुरू करू इच्छिणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांसाठी हे पाऊल मोठा दिलासा देणारं आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)