Join us  

Mutual Funds Investment Tips: १० हजारांचे झाले तब्बल १३ कोटी! गुंतवणूक असावी तर अशीच; म्युच्युअल फंडाने दिले छप्परफाड रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2022 7:48 PM

Mutual Funds Investment Tips: ४ स्टार देण्यात आलेल्या म्युच्युअल फंडाने भन्नाट कामगिरी करून दाखवत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. जाणून घ्या डिटेल्स...

Mutual Funds Investment Tips: तुम्हाला गुंवतणूक करायची असेल, तर आताच्या घडीला अनेकविध पर्याय आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची मानली जाते. मात्र, कमी जोखमीत चांगला परतावा मिळण्यासाठी अनेकविध योजना उपलब्ध आहेत. यातच म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करून उत्तम रिटर्न मिळवता येऊ शकते. दर महिन्याला छोटी रक्कम गुंतवू शकता. म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. यातील छोटी गुंतवणूक तुमच्यासाठी नंतर मोठा फंड तयार केला जाऊ शकतो. अशाच एका मुच्युअल फंडाने छप्परफाड परतावा दिला असून, १० हजाराच्या गुंतवणुकीचे १३ कोटी झाल्याचे सांगितले जात आहे. 

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने ही भन्नाट कामगिरी करून दाखवली आहे. या फंडाला मॉर्निंगस्टारने ३-स्टार रेटिंग आणि व्हॅल्यू रिसर्चने ४-स्टार रेटिंग दिले आहे. ८ ऑक्टोबर १९९५ रोजी हा निधी सुरू करण्यात असून आता या निधीला २७ वर्षे यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत. फंडाने सुरुवातीपासून २२.२९ टक्क्यांचा सीएजीआर दिला आहे. गतवर्षात या फंडाने ११.८९ टक्के वार्षिक एसआयपी परतावा दिला होता. तर गेल्या तीन वर्षांत या फंडाने २७.५३ टक्के वार्षिक SIP परतावा दिला आहे.

गेल्या १० वर्षांत कंपनीने गुंतवणूकदारांना केले श्रीमंत

निप्पॉन इंडिया ग्रोथच्या म्युच्युअल फंडाने दहा वर्षांत १७.३७ टक्के वार्षिक एसआयपी परतावा दिला. १० हजार रुपयांच्या मासिक एसआयपीसह तुमची एकूण गुंतवणूक आता १२ लाख रुपयांवरून २९.७७ लाख रुपयांपर्यंत वाढली असती. गेल्या १५ वर्षांत याच म्युच्युअर फंडाने १५.७१ टक्क्यांचा परतावा दिला आहे. याच कालावधीत १० हजार रुपयांच्या मासिक एसआयपीसह तुमची १८ लाख रुपयांची गुंतवणूक ६५.३५ लाख रुपयांपर्यंत वाढली असती. तसेच गेल्या २० वर्षांत या फंडाने १८.९९ टक्के वार्षिक एसआयपी परतावा दिला आहे. त्यामुळे १० हजार रुपयांच्या मासिक एसआयपीमुळे तुमची २४ लाख रुपयांची संपूर्ण गुंतवणूक आता २.१७ कोटी रुपयांपर्यंत वाढली असती.

दरम्यान, या फंडाने गेल्या २५ वर्षांत २२.१२ टक्के वार्षिक एसआयपी परतावा दिला आहे. १० हजार रुपयांच्या मासिक एसआयपीमुळे तुमची वास्तविक गुंतवणूक ३० लाख रुपयांवरून ८.८७ कोटी रुपयांपर्यंत वाढली असती. तसेच २७ वर्षांपूर्वी म्हणजेच फंड सुरू झाल्यापासून तुम्ही मासिक १० हजार रुपयांची एसआयपी केली असती तर तुमची एकूण ३२.४० लाखाची गुंतवणूक १३.६७ कोटी झाली असती. गेल्या २७ वर्षांच्या कालावधीत निप्पॉन इंडिया ग्रोथच्या म्युच्युअल फंडाने २२.२९ टक्क्यांचा वार्षिक परतावा दिल्याचे सांगितले जात आहे. 

(टीप - या लेखात केवळ शेअरची/गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :गुंतवणूक