Join us  

१५ वर्षांत कोट्यधीश बनवू शकतो १५*१५*१५ चा फॉर्म्युला; ४० व्या वर्षापर्यंत बनू शकता श्रीमंत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 10:46 AM

जर तुम्ही अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल आणि शक्य तितक्या लवकर मोठा निधी उभारायचा असेल तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो.

जर तुम्ही अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल आणि शक्य तितक्या लवकर मोठा निधी उभारायचा असेल तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. एसआयपीद्वारे तुम्ही यामध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास तुम्ही स्वतःला कोट्यधीश देखील बनवू शकता. मार्केट लिंक्ड असल्‍यामुळे, एसआयपीमध्‍ये खात्रीशीर परतावा मिळत नाही. त्याचा परतावा बाजारावर आधारित असतो. परंतु दीर्घ मुदतीत ते १५ आणि २० टक्के परतावा देखील देऊ शकते. त्याचा सरासरी परतावा १२ टक्के मानला जातो. याशिवाय तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो. यासह, तुमची संपत्ती वेगानं वाढते. जर तुम्हाला एसआयपीच्या मदतीनं अल्पावधीत कोट्यधीश व्हायचं असेल तर १५*१५*१५ चा फॉर्म्युला तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कसं बनू शकता कोट्यधीश?१५*१५*१५ नुसार तुम्हाला १५ हजार रुपयांची गुंतवणूक अशा स्कीममध्ये करायची असते ज्यात तुम्हाला १५ वर्षांमध्ये १५ टक्के दरानं व्याज मिळू शकेल. एसआयपी गुंतवणूकीत दीर्घकाळासाठी १५ टक्क्यांचं रिटर्न मिळणं ही मोठी बाब नाही. १५*१५*१५ फॉर्म्युला वापरून जर तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक केली तर १५ हजार रुपये महिन्याप्रमाणे १५ वर्षांत २७ लाख रुपयांची गुंतवणूक होईल. परंतु १५ टक्के हिशोबानं त्यावर मिळणारं व्याज ७४,५२,९४६ रुपये असेल. याप्रकारे गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याज मिळून १५ वर्षांत ते १,०१,५२,९४६ रुपयांचा फंड तयार होईल.

लवकर गुंतवणूक तितका फायदाजितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल, तितक्या लवकर तुम्ही कोट्यधीश बनू शकता. तुम्ही जर २५ व्या वर्षी १५*१५*१५ फॉर्म्युल्यानुसार गुंतवणूक केली तर ४० व्या वर्षी तुम्ही कोट्यधीश बनू शकता. आर्थिक नियमानुसार तुम्हाला तुमच्या उत्पन्नातून २० टक्के वाचवून गुंतवणूक केली पाहिजे. जर तुमचा महिन्याचा पगार ८० हजार असेल तर त्याचे २० टक्के १६ हजार रुपये होतात. अशातच तुम्ही सहजरित्या १५ हजारांची एसआयपी करू शकता. (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा