Join us  

Health Insurance मध्ये कॅशलेस ट्रिटमेंट काय असते, कशी मिळते ही सुविधा? पाहा तुमच्या प्रश्नांची सोपी उत्तरं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 11:06 AM

आरोग्य विमा आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक मदतीसाठी सर्वात उपयुक्त ठरतो.

आरोग्य विमा आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक मदतीसाठी सर्वात उपयुक्त ठरतो. जर तुमच्याकडे आरोग्य विमा नसेल आणि तुम्ही आजारी पडलात, त्यामुळे तुम्हाला रुग्णालयात दाखल करावं लागलं, तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च करावा लागू शकतो. जर तुमचा आरोग्य विमा असेल तर हा सर्व खर्च तुमची विमा कंपनी करते आणि तुमच्या खिशावर कोणताही भार पडत नाही. 

आरोग्य विम्याचे काम वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक सुविधा उपलब्ध करून देणं आहे, जेणेकरून तुम्हाला कर्जाच्या जाळ्यात किंवा कोणत्याही आर्थिक संकटात अडकावं लागणार नाही. त्यामुळे, आजकाल सर्व मेडिक्लेम पॉलिसींमध्ये कॅशलेस फीचर एक सामान्य गोष्ट बनली आहे. आज आपण ही कॅशलेस सुविधा काय आहे आणि तुम्ही कसा क्लेम करू शकता याबाबत माहिती घेऊ.

आरोग्य विम्यामध्ये, विमा कंपन्या दोन प्रकारे उपचारांचा खर्च उचलतात – कॅशलेस आणि रिइम्बर्समेंट. काही रुग्णालयांमध्ये तुम्हाला कॅशलेस सुविधा मिळते. यामध्ये काही शुल्क सोडलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचा खर्च करावा लागत नाही. तर रिइम्बर्समेंटमध्ये तुम्हाला आधी सर्व खर्च तुमच्या खिशातून करावा लागतो आणि त्यानंतर विमा कंपनी तुम्हाला पैसे परत करते.

कॅशलेस सुविधा काय आहे? (What is Cashless Facility)

जर तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कॅशलेस सुविधेचा अर्थ असा आहे की जेव्हा आरोग्य विमा घेणारी व्यक्ती आजारी पडते आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होते, तेव्हा विमा कंपनीकडून मिळालेल्या कार्डद्वारे तो हॉस्पिटलचा खर्च उचलतो. त्याला स्वतःच्या खिशातून काहीही द्यावं लागत नाही. या सुविधेमुळे विमा कंपन्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर थेट हॉस्पिटलला पैसे देतात. यासाठी तुम्हाला पैशाची व्यवस्था करावी लागणार नाही.

क्लेमच्या सुविधेचा कसा लाभ घ्यावा?

  • आरोग्य विमा पॉलिसीमध्ये कॅशलेस क्लेम सुविधेचा लाभ घेण्यासाठी, विमाधारक व्यक्तीला विमा कंपनीच्या लिस्टेड रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात.
  • रुग्णालय विमाधारकाने दिलेल्या तपशीलांची पडताळणी करेल आणि त्यांच्या विमा कंपनीला प्री ऑथोरायझेशन फॉर्म पाठवेल.
  • विमा कंपनी प्री-ऑथोरायझेशन विनंतीची छाननी करेल आणि पॉलिसीच्या कव्हरेज आणि इतर तपशीलांबद्दल हॉस्पिटलला माहिती देईल.
  • प्री ऑथोरायझेशन रिक्वेस्ट रिजेक्ट केल्यास उपचाराचा खर्च तुम्हाला करावा लागतो, नंतर त्याचं रिइम्बर्समेंट केलं जाऊ शकतं.
  • प्री ऑथोरायझेशन रिक्वेस्ट मंजूर झाल्यास, उपचार सुरू होतील आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर, अंतिम बिल आणि डिस्चार्ज पेपर्स विमा कंपनीकडे पाठवले जातील. देयके (लागू असल्यास) आणि खर्च वजा केल्यानंतर ते अंतिम रक्कम सेटल केली जाईल. 

इमर्जन्सीत कॅशलेस नाही

हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की आपत्कालीन परिस्थितीत कॅशलेस सुविधा उपलब्ध नाही, यासाठी तुम्हाला रिइम्बर्समेंट करावं लागेल. कारण नेटवर्क हॉस्पीटल्समध्ये कॅशलेस क्लेमसाठी प्री ऑथोरायझेशन आवश्यक आहे. परंतु, आपत्कालीन परिस्थितीत यासाठी वेळ उपलब्ध नसतो.

टॅग्स :आरोग्यहॉस्पिटल