Join us

Zero Depreciation: झीरो डेप कार इन्शुरन्सबाबत जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे भरपूर पैसे वाचतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 11:08 IST

Zero Dep Insurance: कार इन्शुरन्स खूप महत्वाचा आहे. हा इन्शुरन्स केवळ कायदेशीरदृष्ट्या आवश्यक नाही, तर अपघात झाल्यास आपल्या सर्व नुकसानीची भरपाई देखील मिळते.

Zero Dep Insurance : कार इन्शुरन्स खूप महत्वाचा आहे. हा इन्शुरन्स केवळ कायदेशीरदृष्ट्या आवश्यक नाही, तर अपघात झाल्यास आपल्या सर्व नुकसानीची भरपाई देखील मिळते. कार इन्शुरन्समध्ये आपल्याला अनेक टर्मदेखील ऐकायला मिळतात, त्यापैकी एक म्हणजे झीरो डेप्रिसिएशन. चला तर मग जाणून घेऊया झिरो डेपबद्दल महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला माहित असायला हव्यात.

२०२१ पासून देशातील सर्व नवीन वाहनांच्या खरेदीवर ५ वर्षांचा बंपर टू बंपर इन्शुरन्स असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पण बंपर टू बंपर इन्शुरन्स म्हणजेच झीरो डेप इन्सुरन्स काय हे तुम्हाला माहित आहे का? वाहनांवरील थर्ड पार्टी इन्शुरन्सपेक्षा हा वेगळा आहे आणि वाहन मालकाला त्यातून काय फायदे मिळू शकतात.

कारचा अपघात झाल्यास होणाऱ्या नुकसानीवर जवळपास १००% इन्शुरन्स कव्हर मिळतं. याला 'झीरो डेप्रिसिएशन कव्हर' असंही म्हटलं जातं. या प्रकारच्या विम्यात विमा कंपनी वाहनाच्या भागांचे डेप्रिसिएशन वजा करत नाही, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह विम्यात बदललेल्या भागांचे डेप्रिसिएशन व्हॅल्यू कमी केली जाते.

झिरो डेपमध्ये काय कव्हर होतं?

झीरो डेप इन्शुरन्स सामान्यत: अॅड-ऑन इन्शुरन्स कव्हरेज म्हणून दिला जातो. यामध्ये अपघात किंवा वाहनाचं नुकसान झाल्यास जवळपास सर्वच पार्ट्सवर विमा संरक्षण मिळतं. इंजिन, बॅटरी, टायर, ट्यूब आणि काचा यांचं कव्हर मात्र मिळत नाही. विंडस्क्रीन वगैरेंच्या नुकसानीचा खर्चही काही कंपन्या उचलत असल्या तरी तो सहसा विमा पॉलिसीचा भाग नसतो.

१०० टक्के कव्हर मिळतं

झीरो डेप इन्शुरन्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे १००% डॅमेज कव्हर मिळतं. यामुळे ग्राहकाला कोणतंही टेन्शन राहत नाही. क्लेम सेटलमेंटच्या वेळी ग्राहकाला पूर्ण कव्हरेज मिळतं. शिवाय, नुकसानीनंतर सेवा दिल्यास ग्राहकाला डेप्रिसिएशनच्या खर्चाचा तोटा सहन करावा लागत नाही. लक्झरी कारच्या सेवेसाठी याचा खूप उपयोग होतो.

तुमचा क्लेम निकाली काढताना इन्शुरन्स कंपनी तुमच्या कार पार्ट्सचे सर्व पैसे देईल. डेप्रिसिएशनचा विचार न केल्यानं सेटलमेंटची रक्कम जास्त असते आणि झीरो डेप्रिसिएशनमुळे ग्राहकावर फारसा बोजा पडत नाही.

टॅग्स :कारव्यवसाय