Join us  

कुटुंबासाठी योग्य विमा कसा निवडावा? जाणून घ्या काही टिप्स, म्हणजे अडचण येणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 8:20 AM

विमा निवडताना सर्वप्रथम आपण विमा कोणत्या उद्देशाने घेत आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यातून योग्य निवड करावी लागते.

अर्जुन : कृष्णा, सध्या संपूर्ण भारतात निवडणुकीची धूम चालू आहे. जसे आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आणि सुरक्षतेसाठी योग्य उमेदवार निवडतो, तसेच आपले भविष्य आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षतेसाठी योग्य विमा कसा निवडायचा? कृष्ण : अर्जुन, जसे मतदान न करणे धोकादायक ठरू शकते, तसेच स्वतःकरिता विमा न घेणे तुमच्या कुटुंबाला अनपेक्षित वेळी आर्थिक संकटात टाकू शकते. विमा निवडताना खालील गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

१. विमा निवडताना सर्वप्रथम आपण विमा कोणत्या उद्देशाने घेत आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यातून योग्य निवड करावी लागते.२. इन्शुरन्स कंपनीबद्दल सर्व माहिती घेतली पाहिजे. जसे की, कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड, क्लेम सेटलमेंट रेशिओ इ.३. आपली पॉलिसी आपल्या वाढत्या गरजा आणि कुटुंबासाठी उचित आहे का, याची नियमित पडताळणी केली पाहिजे.४. ज्याचे प्रिमियम भरायला जमेल, अशीच पॉलिसी घ्यावी. अकाली पॉलिसी सरेंडर केल्यास नुकसान होऊ शकते.५. विम्याचे कव्हरेज आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकतील का, याची पडताळणी केली पाहिजे.६. इन्शुरन्स ॲडव्हायझरच्या सल्ल्याने योग्य पॉलिसी आपण निवडू शकतो.७. कमी वयात विमा करून घेतल्यास प्रिमियम कमी लागतो.

अर्जुन : कृष्णा, योग्य विम्याची निवड कशी करावी?कृष्ण : अर्जुन, टर्म इन्शुरन्स पॉलिसींतर्गत दिलेले प्रिमियम परत मिळत नाही, परंतु यात प्रिमियम कमी असतो. इतर एंडोमेंट पॉलिसीमध्ये प्रिमियम बोनससोबत परत मिळतो, पण यात प्रिमियम जास्त असतो. उदा. जर विम्याची रक्कम ५० लाख असेल, तर टर्म पॉलिसीमध्ये वार्षिक प्रिमियम २० हजार असेल, परंतु एंडाेमेंट पॉलिसीमध्ये प्रिमियम ३ लाखांपर्यंत असेल. पण, एंडोमेंटमध्ये मिळणारा बोनस म्युच्युअल फंडमध्ये मिळणाऱ्या रिटर्नपेक्षा कमीच असतो. यात सामान्य टर्म इन्शुरन्स घेऊन बाकीची रक्कम म्हणजे २.८ लाख रुपये म्युच्युअल फंडात आपण गुंतवू शकतो. यात सुरक्षा आणि रिटर्न दोन्हीही जास्त मिळेल.- उमेश शर्मा, चार्टर्ड अकाउंटंट 

टॅग्स :पैसा