Income Tax Return: जर तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल तर तुम्हाला फॉर्म १६ बद्दल माहिती असणं आवश्यक आहे. कंपन्या हा फॉर्म जारी करतात. हा फॉर्म सर्व पगारदार वर्गासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण त्यात पगारदार वर्गाचं उत्पन्न आणि कराची माहिती असते. मूल्यांकन वर्षात १५ जून किंवा त्यापूर्वी कंपनी ते जारी करते. जर तुम्ही एका आर्थिक वर्षात अनेक ठिकाणी काम केलं असेल तर तुम्हाला प्रत्येक कंपनीकडून वेगळा फॉर्म १६ घ्यावा लागेल. फॉर्म १६ शी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
फॉर्म १६ चं महत्त्व काय?
कर भरताना, आपल्याला आपल्या उत्पन्नाचा आणि भरलेल्या करांचा निश्चित पुरावा म्हणून फॉर्म १६ देणं आवश्यक आहे. याशिवाय हा फॉर्म तुमच्यासाठी इन्कम प्रूफ म्हणून काम करतो. कर्ज घेताना आपल्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून तुम्ही ते बँक किंवा इतर वित्तीय संस्थेला देऊ शकता. आपला भरलेला कर योग्य आहे की नाही याची अचूक माहितीही तुम्हाला फॉर्म १६ च्या माध्यमातून मिळते.
फॉर्ममध्ये दोन पार्ट
फॉर्म १६ चे दोन भाग असतात: फॉर्म १६ पार्ट ए आणि पार्ट बी. पार्ट ए मध्ये संस्थेचे टॅन, संस्था आणि कर्मचाऱ्याचे पॅन, पत्ता, मूल्यांकन वर्ष, नोकरीचा कालावधी आणि सरकारला सादर केलेल्या टीडीएसचं संक्षिप्त वर्णन असते. तर फॉर्म बी मध्ये बेसिक सॅलरी, घरभाडं भत्ता, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रिब्यूशन, टीडीएस, प्रोफेशनल टॅक्स अशा पगाराच्या ब्रेकअपची माहिती नोंदवली जाते. एचआरए, वैद्यकीय भत्ता आणि इतर भत्ते इत्यादी कर सवलतींची माहिती असते. तसंच प्राप्तिकर अधिनियम, १९६१ च्या परिच्छेद ६ अ अन्वये दावा केलेल्या किंवा भरलेल्या करासह थकित कराची माहिती आणि कर परताव्याची माहिती नोंदवली जाते.
फॉर्म १६ देणं बंधनकारक
१९६१ च्या प्राप्तिकर कायद्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा कर्मचाऱ्यांना फॉर्म १६ देणं कंपनीला बंधनकारक आहे. जर कंपनीनं फॉर्म १६ जारी केला नाही तर त्याला दंडाला सामोरं जावं लागू शकतं. प्राप्तिकर कायद्याच्या कलम २७२ अन्वये दररोज १०० रुपये दंड आकारला जाऊ शकतो.
कुठून डाऊनलोड कराल?
- फॉर्म १६ डाउनलोड करण्यासाठी www.tdscpc.gov.in भेट द्या.
- ट्रेसमध्ये लॉग इन करा आणि युझर आयडी, पासवर्ड, पॅन आणि कॅप्चा एन्टर करा.
- डॅशबोर्डवरून डाउनलोडवर जा आणि फॉर्म १६ वर जा.
- फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर आर्थिक वर्ष आणि पॅन सिलेक्ट करा. तुम्हाला फॉर्म १६ मिळेल.