Join us

ज्येष्ठांच्या एफडी व्याजावर कर, सरकारची कमाई झाली बक्कळ; किती कोटी कमावले? पाहा, आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 13:29 IST

गेल्या पाच वर्षांत एकूण ठेवींची रक्कम १४३ टक्क्यांनी वाढून २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या अखेरीस ३४ लाख कोटी रुपये झाली आहे.

Senior Citizen Fixed Deposit: मोदी सरकारनं गेल्या आर्थिक वर्षात फिक्स्ड डिपॉझिटवर (FD) मिळणाऱ्या व्याजावर ज्येष्ठ नागरिकांकडून २७,००० कोटी रुपयांहून अधिक टॅक्स जमा केला आहे. देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक स्टेट बँकेच्या रिसर्च रिपोर्टमधून ही माहिती समोर आलीये. 

अधिक लोकप्रिय आहे योजना 

एसबीआय रिसर्चच्या अहवालात असं म्हटलंय की, गेल्या पाच वर्षांत एकूण ठेवींची रक्कम १४३ टक्क्यांनी वाढून २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या अखेरीस ३४ लाख कोटी रुपये झाली आहे, तर पाच वर्षांपूर्वी ती १४ लाख कोटी रुपये होती. रिपोर्टनुसार, फिक्स्ड डिपॉझिटवरील उच्च व्याजदरांमुळे, ही योजना ज्येष्ठ नागरिकांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. या कालावधीत, फिक्स्ड डिपॉझिट खात्यांची एकूण संख्या ८१ टक्क्यांनी वाढून ७.४ कोटी झाली. 

कोट्यवधी खात्यात १५ लाखांपेक्षा अधिक रक्कम 

यापैकी ७.३ कोटी खात्यांमध्ये १५ लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा आहे. या ठेवींवरील ७.५ टक्के व्याजाचा अंदाज लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांनी गेल्या आर्थिक वर्षात केवळ व्याजाच्या स्वरूपात २.७ लाख कोटी रुपये कमावले आहेत. यामध्ये बँक ठेवींमधून २.५७ लाख कोटी रुपये आणि उर्वरित रक्कम ही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील असल्याचं, एसबीआयच्या रिसर्चमध्ये नमूद केलंय. 

ज्येष्ठ नागरिकांनी जर सरासरी १० टक्के कर भरलाय असं मानलं तर, भारत सरकारला याद्वारे २७,१०६ कोटी रुपये कराद्वारे मिळाले, असंही रिपोर्टमध्ये म्हटलंय. देशातील अनेक बँक्स सीनिअर सिटिझन्सना आपल्या फिक्स्ड डिपॉझिटवर ८.१ टक्क्यांपर्यंतचं व्याज देत आहे.

टॅग्स :गुंतवणूकज्येष्ठ नागरिकसरकार