Income Tax Form: इनकम टॅक्स ॲक्ट २०२५ अंतर्गत आता सामान्यतः वापरले जाणारे फॉर्म १५जी आणि फॉर्म १५एच बंद करून त्याऐवजी नवीन 'फॉर्म १२१' आणला जात आहे. टीडीएस (TDS) कपात वाचवण्यासाठी केल्या जाणाऱ्या घोषणा सोप्या करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या बदलामुळे फॉर्म भरण्याची पद्धत आणि पात्रता या दोन्हीत बदल होणार आहे.
फॉर्म १२१ म्हणजे काय?
फॉर्म १२१ हे एक 'सेल्फ डिक्लेरेशन' आहे, जे करदाता स्वतः सादर करतो. या डिक्लेरेशनद्वारे करदाता असं घोषित करतो की, चालू आर्थिक वर्षात त्यांचं अंदाजित एकूण उत्पन्न शून्य आहे, त्यामुळे त्याच्या उत्पन्नावर कोणताही टीडीएस कापला जाऊ नये. जेव्हा करदाता हा फॉर्म आपल्या बँकेत किंवा कंपनीत जमा करतो, तेव्हा ते डिक्लेरेशन योग्य आणि वैध असेल तर ती संस्था त्या उत्पन्नावर टीडीएस कापणार नाही.
पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
फॉर्म १५जी आणि १५एच मध्ये काय बदल होईल?
सर्वात मोठा बदल म्हणजे आता दोन वेगवेगळ्या फॉर्मऐवजी एकाच फॉर्मचा वापर होईल. जुन्या नियमांनुसार, फॉर्म १५जी ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी होता, तर फॉर्म १५एच फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी (६० वर्षे किंवा त्याहून अधिक) होता. नवीन नियमांनुसार, 'फॉर्म १२१' हा सर्व पात्र व्यक्तींसाठी एकच सामायिक फॉर्म असेल, मग त्यांचं वय कितीही असो. यामुळे वयानुसार वेगवेगळे फॉर्म निवडण्याची गरज उरणार नाही आणि कर प्रक्रिया अधिक सोपी होईल.
फॉर्म १२१ कोण भरू शकतं?
- भारतीय नागरिक (वय ६० पेक्षा कमी किंवा जास्त असले तरीही).
- हिंदू अविभक्त कुटुंब (HUF).
- काही इतर पात्र संस्था.
- टीप: कंपन्या, फर्म्स आणि अनिवासी भारतीय हा फॉर्म भरण्यास पात्र नाहीत.
कोणत्या उत्पन्नावर टीडीएस कापला जाणार नाही?
हा फॉर्म विविध प्रकारच्या उत्पन्नावरील टीडीएस वाचवण्यासाठी वापरला जाऊ शकतो, जसे की:
- बँक ठेवींवर मिळणारं व्याज.
- डिव्हिडंड, भाडं आणि विमा कमिशन.
- म्युच्युअल फंडमधून मिळणारं उत्पन्न आणि जीवन विम्याची रक्कम.
- भविष्य निर्वाह निधी (PF) काढणं आणि पेन्शन.
फॉर्म १२१ भरणं अनिवार्य आहे का?
नाही, हा फॉर्म भरणं पूर्णपणे ऐच्छिक आहे. हे केवळ अशा करदात्यांसाठी आहे ज्यांचं करपात्र उत्पन्न शून्य आहे आणि ज्यांना आधीच टीडीएस कापला जाऊ नये असं वाटतं. जर तुम्ही हा फॉर्म भरला नाही, तर सामान्य नियमानुसार टीडीएस कापला जाईल आणि नंतर रिटर्न फाईल करताना तुम्ही रिफंडचा दावा करू शकता.
फॉर्म १२१ कसा जमा करावा?
तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन जमा करू शकता, जर संबंधित संस्था डिजिटल सबमिशनची सुविधा देत असेल. दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही तो पेयर (बँक/कंपनी) कडे प्रत्यक्ष सबमिट करू शकता. पेयरला या फॉर्मचा तपशील इनकम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं अपलोड करावा लागेल आणि तिमाही टीडीएस स्टेटमेंटमध्ये (फॉर्म १४०) या व्यवहारांची नोंद करावी लागेल.
लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या बाबी
- चुकीची माहिती: जर तुमचं उत्पन्न करपात्र असेल आणि तुम्ही चुकीची घोषणा केली, तर तुम्हाला दंड किंवा शिक्षेला सामोरं जावं लागू शकतं.
- विविध स्रोत: जर तुमचे उत्पन्न अनेक स्रोतांतून असेल, तर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे फॉर्म १२१ जमा करावे लागतील.
- वेळेचं महत्त्व: जर तुम्ही फॉर्म उशिरा जमा केला, तर टीडीएस थांबवण्यासाठी तो ग्राह्य धरला जाणार नाही आणि टीडीएस कापला जाऊ शकतो.
Web Summary : Form 121 replaces forms 15G/15H under the Income Tax Act 2025, simplifying TDS exemption declarations. Applicable to all Indian citizens regardless of age, it covers various income sources. Filing is optional for those with zero taxable income; otherwise, standard TDS rules apply.
Web Summary : आयकर अधिनियम 2025 के तहत फॉर्म 121 ने 15जी/15एच की जगह ली, जिससे टीडीएस छूट घोषणाएं सरल हो गईं। यह सभी भारतीय नागरिकों पर लागू होता है, चाहे उनकी उम्र कुछ भी हो, और इसमें आय के विभिन्न स्रोत शामिल हैं। यह फाइलिंग उन लोगों के लिए वैकल्पिक है जिनकी कर योग्य आय शून्य है; अन्यथा, सामान्य टीडीएस नियम लागू होंगे।