Join us

ट्रम्प टॅरिफच्या मागे धावले अन् स्वतःसोबत गुंतवणूकदारांनाही पाडलं तोंडावर, त्यांचाच कॉईन कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 16:10 IST

Trump Meme Coin : डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीवेळी क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत मोठमोठे दावे केले होते. मात्र, आता त्यांचा स्वतःचा मीम कॉइनची किंमत ७५ टक्के घसरली आहे.

Trump Meme Coin : अमेरिकेच्या अध्यपदावर बसल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. याचा परिणाम फक्त अमेरिकाच नाही तर जगभर पाहायला मिळत आहे. मात्र, ट्रम्प यांची ही आक्रमक वृत्ती आता अमेरिकन लोकांच्याच मुळावर उठली आहे. तर आपल्याच निर्णयांमुळे ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर धोंडा मारुन घेतला आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प सरकारने लादलेल्या आयात शुल्कामुळे जग हैराण झाले आहे, तर दुसरीकडे क्रिप्टोकरन्सी ट्रम्प मीम कॉईन गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे. वास्तविक, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मीम कॉईनमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची किंमत गेल्या काही दिवसांतील त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून ७५ टक्क्यांनी घसरली आहे.

ट्रम्प मीम कॉइनने घातला होता धुमाकूळ  डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यापासून क्रिप्टोकरन्सीला सुगीचे दिवस आले आहेत. एका बिटकॉइनची किंमत ८६ लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. याच संधीचं सोनं करण्यासाठी ट्रम्प यांनी १७ जानेवारी २०२५ रोजी स्वतःचे ट्रम्प मीम कॉइन लॉन्च केला. या कॉइनने क्रिप्टो मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली होती. त्याची सुरुवातीची किंमत सुमारे ७ डॉलर होती. काही तासांत ती ८००० टक्क्यांच्या वाढीसह ७४.८५ डॉलरच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. यामुळे आणखी गुंतवणूकदार आकर्षित झाले. मात्र, त्यानंतर कॉइनमध्ये घसरण सुरू झाली.

ट्रम्प मीम कॉइन घसरण्याचं कारण काय?ट्रम्प यांचे मीम कॉइनची किंमत घसरण्यामागे अनेक कारणे आहेत. एकीकडे बाजारातील सट्टेबाजी संपली तर दुसरीकडे गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला. अलीकडच्या काही दिवसांत, ट्रम्प मीम कॉइनची किंमत २४ तासांत २४ टक्क्यांनी घसरली आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांचा क्रिप्टोकरन्सीवरील विश्वास उडत असल्याचे चित्र आहे. गेल्या एका आठवड्यात त्याची किंमत ३० टक्क्यांहून अधिक घसरली आहे.

गुंतवणूकदार उध्वस्त?डोनाल्ड ट्रम्प यांनी क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूकदारांना मोठमोठी स्वप्ने दाखवली होती. अमेरिकेला क्रिप्टोकरन्सीची कॅपिटल करण्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार याकडे आकर्षित झाले. मात्र, प्रत्यक्षात ट्रम्प यांचेच मीम कॉइनची किंमत घसरल्याने गुंतवणूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे.

सध्या संपूर्ण क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये भितीची वातावरण पाहायला मिळत आहे. फक्त ट्रम्प मीम कॉइनच नाही तर आघाडीच्या क्रिप्टोकरन्सी कॉइनमध्येही मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सट्टेबाजी आणि सरकारी घोरणांमुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरण होत असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पक्रिप्टोकरन्सीअमेरिकाबिटकॉइन