Join us
Daily Top 2Weekly Top 5

जून आणि ऑगस्टमध्ये रेपो दरात पुन्हा RBI कपात करणार का? लोन होऊ शकतात आणखी स्वस्त

By जयदीप दाभोळकर | Updated: April 17, 2025 13:07 IST

गेल्या अनेक वर्षांतील महागाईचा कमी स्तर, चांगला मान्सून येण्याची शक्यता आणि कमी अपेक्षा यामुळे रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पुन्हा कपात होण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक वर्षांतील महागाईचा कमी स्तर, चांगला मान्सून येण्याची शक्यता आणि कमी अपेक्षा यामुळे रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पुन्हा कपात होण्याची शक्यता आहे. आरबीआयनं ९ एप्रिल २०२५ रोजी रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात केली होती. यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये २५ बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली होती. यानंतर आता रेपो रेट कमी करून 6 टक्के करण्यात आला आहे.

रेपो दरात कपातीची शक्यता

सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआयनं जून आणि ऑगस्ट महिन्यात रेपो दरात पुन्हा ५० बेसिस पॉईंटची कपात होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसं झाल्यास कर्जे पुन्हा स्वस्त होतील.

महागाईचा दरात सातत्यानं घसरण

चांगला मान्सून आणि महागाई कमी होण्याचा अंदाज यामुळे रेपो दरात कपात होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये महागाई दर ६७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला होता. मान्सून चांगला होण्याची शक्यता असल्यानं कृषी क्षेत्रात चांगलं उत्पादन मिळण्याची शक्यता वाढत आहे. देशातील मागणी वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरातही कपात केली जाऊ शकते.

रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात केलेल्या या कपातीचा उद्देश आर्थिक विकासाला चालना देणं, कर्ज स्वस्त करणं आणि ग्राहकांचा खर्च आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं हा आहे.

कर्ज स्वस्त होणार?

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यास त्याचा थेट परिणाम बँकांच्या कर्जदरांवर होतो. होम लोन, पर्सनल लोन, कार लोन आणि इतर प्रकारची कर्जे स्वस्त होतात. रेपो दरात कपात केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियासह अन्य बँकांनी आधीच व्याजदरात कपात केली आहे. भविष्यात कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जे लोक भविष्यात कर्ज घेण्याच्या तयारीत आहेत किंवा जे आधीच गृहकर्ज किंवा इतर प्रकारचे कर्ज चालवत आहेत त्यांना याचा लाभ मिळू शकतो.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकपैसा