Join us

भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 15:26 IST

Indian Rupee Notes : भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण, नोटांवर फक्त महात्मा गांधी यांचाच फोटो का? अशा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का?

Indian Rupee Notes : आपल्या भारतीय रुपयाच्या नोटांवर फक्त महात्मा गांधींचेच चित्र का दिसते, इतर कोणत्याही स्वातंत्र्यसैनिक, कवी किंवा नेत्याचे चित्र का नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. यावर अनेकदा वादविवादही झाले आहेत. पण, आता खुद्द भारतीय रिझर्व्ह बँकेने स्वतः या प्रश्नाचे उत्तर दिले आहे!

गांधीजींवरच का एकमत झाले?आरबीआयने सांगितले की, भारतीय रुपयावर कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचे चित्र लावायचे, यासाठी रवींद्रनाथ टागोर, मदर तेरेसा आणि अबुल कलाम आझाद यांच्यासह अनेक नावांचा विचार करण्यात आला होता. मात्र, शेवटी महात्मा गांधींच्या नावावरच एकमत झाले. याच एकमतामुळे गांधीजींचे चित्र चलनी नोटांवर इतका काळ कायम आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कामकाजावर आधारित 'आरबीआय अनलॉक्ड: बियॉन्ड द रुपी' या माहितीपटात ही माहिती स्पष्ट करण्यात आली आहे.

मध्यवर्ती बँकेने असेही सांगितले की, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे चित्र नोटेवर असल्यास ती ओळखणे सोपे होते. जर बनावट नोटेची रचना चांगली नसेल, तर प्रसिद्ध व्यक्तीचा फोटो लोकांना खरी आणि बनावट नोट ओळखायला मदत करतो.

स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर नोटांवर काय होते?स्वातंत्र्यापूर्वी: ब्रिटिश राजवटीत भारतीय रुपयांवर ब्रिटिश साम्राज्याची भव्यता दाखवली जायची. यावर वनस्पती आणि प्राण्यांची (जसे की वाघ, हरण) चित्रे असायची, तसेच राजाची अलंकृत चित्रे देखील असत.स्वातंत्र्यानंतर: भारत स्वतंत्र झाल्यावर हळूहळू नोटांवरील चित्रे बदलली. सुरुवातीला अशोक स्तंभाचे सिंहाचे चिन्ह आणि प्रसिद्ध ठिकाणे वापरली गेली.काळानुसार, भारताच्या विकासाची आणि प्रगतीची कहाणी रुपयांवर चित्रांद्वारे सांगण्यात येऊ लागली. देशातील विज्ञान क्षेत्रातील प्रगती दर्शवण्यासाठी आर्यभट्ट यांचे चित्र आणि हरित क्रांतीची कामगिरी दर्शवण्यासाठी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची चित्रे नोटांवर छापण्यात आली.

महात्मा गांधींचा फोटो पहिल्यांदा कधी आला?रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटनुसार, महात्मा गांधींचा फोटो पहिल्यांदा त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १९६९ मध्ये १०० रुपयांच्या स्मारक नोटेवर छापण्यात आला होता. यात सेवाग्राम आश्रमासह त्यांचे चित्र दाखवण्यात आले होते. १९८७ पासून त्यांचे चित्र नियमितपणे रुपयावर दिसू लागले. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये गांधीजींचे चित्र असलेल्या ५०० रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे बनावट नोटा तयार करणे सोपे झाल्याने, १९९६ मध्ये नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह एक नवीन 'महात्मा गांधी मालिका' सादर करण्यात आली.

वाचा - अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

आरबीआय देशभरात पैसे कसे पोहोचवते?आरबीआयने त्यांच्या नवीन माहितीपटात हेही उघड केले आहे की, ते प्रिंटिंग प्रेसमधून देशाच्या कानाकोपऱ्यात रुपये पोहोचवण्यासाठी रेल्वे, जलमार्ग आणि विमाने यांसारख्या प्रमुख वाहतूक प्रणालींचा वापर करतात. आरबीआयचे हे काम पहिल्यांदाच अशा माहितीपटातून लोकांसमोर आले आहे. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकबँकिंग क्षेत्र