Join us

Savings Account आणि Current Account मध्ये काय असतो फरक, काय आहेत त्यांचे फायदे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 11:03 IST

Saving Account Vs Current Account : एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा ऑनलाइन व्यवहार करायचा असेल, तर त्यासाठी बँक खातं आवश्यक असतं.

एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा ऑनलाइन व्यवहार करायचा असेल, तर त्यासाठी बँक खातं आवश्यक असतं. पगारदारांचा पगारही दरमहा बँक खात्यात जमा केला जातो. बँकेत बचत खातं (Saving Account) आणि चालू खातं (Current Account) अशी दोन प्रकारची खाती उघडली जातात. दोन्ही खाती ठेवी आणि व्यवहार दोन्हीसाठी वापरली जातात. पण तरीही ही खाती एकमेकांपेक्षा बरीच वेगळी आहेत. जाणून घेऊ बचत आणि चालू खात्यात काय फरक आहे.

दोन्हीत फरक काय?

पैसे वाचवण्याच्या हेतूनं लोक बचत खाती उघडतात. नियमित सेव्हिंग अकाऊंट, सॅलरी अकाऊंट, झिरो बॅलन्स अकाऊंट आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशिष्ट प्रकारची खाती इत्यादी बचत खाती आहेत. त्यावर अडीच ते चार टक्के व्याज मिळतं. त्याचबरोबर चालू बँक खातं त्या ग्राहकांसाठी आहे जे नियमितपणे मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार करतात. हे विशेषतः व्यावसायिकांसाठी तयार केलेलं असतं. मात्र, चालू बँक खात्यावर व्याज मिळत नाही.

मिनिमम बॅलन्स

झिरो बॅलन्स अकाऊंट आणि सॅलरी अकाऊंट व्यतिरिक्त बहुतांश बचत खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड भरावा लागतो. परंतु चालू खात्यात तसं होत नाही. यामध्ये तुम्हाला सध्याच्या बॅलन्सपेक्षा जास्त पैसे काढण्याची सुविधा मिळते.

व्यवहाराची मर्यादा काय?

बचत खात्यातून महिन्याभरात किती व्यवहार करता येतील याची मर्यादा आहे, पण चालू बँक खात्यात तशी कोणतीही मर्यादा नाही. याशिवाय बचत खात्यात जास्तीत जास्त रक्कम ठेवण्याचीही मर्यादा आहे, तर चालू खात्यात अशी कोणतीही मर्यादा नाही.

कर नियम

बचत खात्यातील ठेवींवर व्याज मिळतं आणि ग्राहकाला व्याजाच्या स्वरूपात मिळणारं उत्पन्न इन्कम टॅक्सच्या कक्षेत येतं, तर चालू खात्यात व्याज मिळत नसल्यानं ते कराच्या कक्षेबाहेर असतं.

टॅग्स :बँकव्यवसाय