Join us

Pre Approved Loan : काय असतं प्री अप्रुव्ह्ड लोन? सामान्य कर्जापेक्षा कमी असतो का व्याजदर? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 10:45 IST

Pre Approved Loan : बँका काही ग्राहकांना प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोनही देतात. प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन हे पर्सनल लोनसारखंचं असतं, फरक एवढाच आहे की ते घेण्यासाठी ग्राहकाला अर्ज करावा लागत नाही. जाणून घेऊ हे घेणं फायद्याचं आहे की नाही.

Pre Approved Loan : लोकांना सामान्यत: पैशांची तातडीची गरज असताना पर्सनल लोन घेणं योग्य वाटतं. याचं कारण म्हणजे बँका किंवा बिगर बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) ज्या ग्राहकांची क्रेडिट हिस्ट्री चांगली आहे, त्यांना तातडीनं हे कर्ज देतात. त्याचबरोबर बँका काही ग्राहकांना प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोनही देतात. प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन हे पर्सनल लोनसारखंचं असतं, फरक एवढाच आहे की ते घेण्यासाठी ग्राहकाला अर्ज करावा लागत नाही, पण बँक त्यासाठी ग्राहकाशी संपर्क साधते. या कर्जावरील व्याज कमी सामान्य वैयक्तिक कर्जापेक्षा ही कमी असू शकते. परंतु, प्रत्येक ग्राहकाला कमी दरात प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन दिलं जातं असं नाही.

प्री-अप्रूव्ह्ड लोन ही एक ऑफर आहे जी बँक आपल्या ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट स्कोअर, उत्पन्न आणि बँकेशी त्यांच्या मागील संबंधांच्या आधारे ऑफर करते. प्री-अप्रूव्ह्ड लोन म्हणजे बँकेनं आधीच तुमची आर्थिक परिस्थिती आणि क्रेडिट स्कोअरचं मूल्यमापन केलंय आणि तुम्हाला कर्जासाठी पात्र मानलंय. या प्रक्रियेत, बँक आपल्याला एक प्रस्ताव पाठवते ज्यात कर्जाची रक्कम, व्याज दर आणि इतर अटींचा समावेश असतो. 

प्री-अप्रूव्ह्ड लोन ऑफर्स : बँक ग्राहकांना ईमेल, एसएमएस किंवा मोबाइल अॅपद्वारे ऑफर पाठवते.

प्री-अप्रूव्ह्ड लोनची वैशिष्ट्ये : प्री-अप्रूव्ह्ड लोन हा एक सोयीस्कर पर्याय आहे जो आर्थिक गरजा त्वरित पूर्ण करण्यास मदत करतो.

जलद प्रक्रिया : ग्राहकाची आर्थिक माहिती आधीच उपलब्ध झाल्यानं कर्ज मंजूर होऊन त्याचं वितरण त्वरीत होतं.

कमी कागदपत्रे : प्री-अप्रूव्ह्ड लोनमध्ये खूप कमी कागदपत्रे बँकेला द्यावी लागतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये, कागदपत्रांची आवश्यकता देखील नसते.

नो गॅरंटी : हे कर्ज असुरक्षित आहे, त्यामुळे त्यासाठी गॅरंटीची गरज नाही.

टॉप-अप पर्याय: विद्यमान कर्ज असलेल्या ग्राहकांना अतिरिक्त कर्ज देखील दिलं जाऊ शकतं.

काय आहे प्रक्रिया?

बँक तुमचा क्रेडिट स्कोअर आणि फायनान्शियल हिस्ट्रीचे विश्लेषण करते. जर तुम्ही पात्र असाल तर प्री-अप्रूव्ह्ड लोन दिलं जातं. यानंतर ग्राहक कर्जाच्या अटी वाचून स्वीकारू शकतो. तज्ज्ञांच्या मते, प्री-अप्रूव्ह्ड लोन तेव्हाच घ्या जेव्हा त्याच्या अटी आणि व्याजदर आपल्यासाठी योग्य असतील. गरजेपेक्षा जास्त कर्ज घेणं टाळा आणि त्याचा योग्य वापर करा. प्री अप्रुव्ह्ड लोन असलं तरी व्याजदर नेहमीच कमी नसतात. त्यामुळे व्याजदर नक्की पाहा.

टॅग्स :बँक