Join us

Home Loan सोबत बँका कोणकोणते चार्जेस वसूल करतात; माहिती घेतलीत तर राहाल फायद्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 10:58 IST

Home Loan Charges: घर ही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठी खरेदी असते. जर तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज करणार असाल तर लक्षात ठेवा की यासाठी बँका अनेक शुल्क आकारतात. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत हे चार्जेस.

Home Loan Charges: घर ही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठी खरेदी असते. हा मोठा खर्च असतो. त्यामुळे घर घेण्यासाठी बहुतांश लोक गृहकर्जाचा आधार घेतात. गृहकर्ज हे सर्वात दीर्घ मुदतीचं कर्ज असतं. बँका साधारणत: ३० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी गृहकर्ज देतात. मात्र, गृहकर्जाचे व्याजदर सर्वात कमी आहेत. जर तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज करणार असाल तर लक्षात ठेवा की यासाठी बँका अनेक शुल्क आकारतात. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत हे चार्जेस.

प्रोसेसिंग फी

गृहकर्जाच्या अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी हे शुल्क आकारले जाते. कर्ज मिळो वा न मिळो, हे शुल्क आकारलं जातं. हे शुल्क रिफंडेबल नाही. जर तुम्ही एखाद्या बँकेत किंवा एनबीएफसीकडे कर्जासाठी अर्ज केला आणि त्यानंतर तुम्ही तुमचा विचार बदलला तर तुमची प्रोसेसिंग फी वाया जाईल. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी कोणत्या बँकेकडून किंवा एनबीएफसीकडून कर्ज घ्यायचं आहे याची खात्री करून घ्या. कर्जाच्या अर्जासोबत प्रोसेसिंग फी आगाऊ आकारली जाते. 

मॉर्गेज डीड फी

गृहकर्ज निवडताना हे शुल्क आकारलं जातं. सामान्यत: ही गृहकर्जाची टक्केवारी असते आणि कर्ज घेण्यासाठी भरलेल्या एकूण शुल्काचा हा एक मोठा भाग असतो. गृहकर्जाचा प्रोडक्ट अधिक आकर्षक करण्यासाठी काही संस्था हे शुल्क माफ करतात.

लीगल फी

बँका किंवा एनबीएफसी मालमत्तेच्या कायदेशीर स्थितीची तपासणी करण्यासाठी सहसा बाहेरील वकिलांची नेमणूक करतात. त्यासाठी वकील जे शुल्क आकारतात, ते वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांकडून आकारतात. मात्र, संस्थेनं मालमत्तेला कायदेशीर मान्यता दिली असेल तर हे शुल्क लागू होत नाही.

कमिटमेंट फी

काही बँका किंवा एनबीएफसी कर्जाची प्रक्रिया आणि मंजुरीनंतर निर्धारित मुदतीत कर्ज न घेतल्यास कमिटमेंट फी आकारतात. हे एक शुल्क आहे जे अवितरित कर्जावर आकारलं जातं. हे शुल्क सहसा मंजूर आणि वितरित रकमेतील फरकाची टक्केवारी म्हणून आकारलं जातं.

प्रीपेमेंट पेनल्टी

प्रीपेमेंट म्हणजे कर्जदार कर्जाची मुदत संपण्यापूर्वीच कर्जाची रक्कम फडतो. यामुळे बँकेला व्याजदरात तोटा होतो, त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी काही बँका काही प्रमाणात हा दंड आकारतात. वेगवेगळ्या बँकांमध्ये हे शुल्क वेगवेगळं असतं. काही बँका हे शुल्क आकारतही नाहीत.

टॅग्स :बँक