Join us
Daily Top 2Weekly Top 5

Loan काढून कार घेण्याचा विचार आहे? मग २०/४/१० हा फॉर्म्युला वापरा अन् टेन्शन फ्री व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 14:01 IST

Car Loan Tips : तुम्हाला टेन्शन फ्री कार घ्यायची असेल तर तुम्ही २०-४-१० हे सूत्र वापरू शकता. या फॉर्म्युलात तुमचे बजेट बसत असेल तर डोळे झाकून गाडी घरी आणा.

Car Loan Tips : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक ऑटोमोबाईल कंपन्या ग्राहकांना कारवर आकर्षक ऑफर देत आहेत. तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत आहात का? जर तुम्हाला कार रोखीने खरेदी करायची असेल तर उत्तम. पण जर कर्ज काढून कार घ्यायची असेल तर काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही कार लोन घेऊन गाडी घेत असाल तर तुम्हाला २०-४-१० चा नियम माहित असणे आवश्यक आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला किती किमतीची कार घ्यावी? त्यासाठी किती कर्ज घ्यावे? ह्याचं उत्तर देतो.

डाउन पेमेंट किती असावे?२०-४-१० च्या नियमानुसार, कार खरेदी करताना, तुम्ही कमीत कमी २० टक्के किंवा त्याहून अधिक रक्कम डाउन पेमेंट म्हणून भरावी. जर तुमच्याकडे डाउन आवश्यक डाउन पेमेंटसाठी पैसे असतील तर पहिला प्रश्न सुटला.

कर्जाचा कालावधी किती असावा?२०-४-१० नियम सांगतो की ग्राहकांनी ४ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी कार लोन घेतले पाहिजे. म्हणजेच कर्जाचा कालावधी जास्तीत जास्त ४ वर्षे असावा. अशा परिस्थितीत तुम्ही ४ वर्षांच्या आत कर्ज फेडू शकाल इतक्यात रकमेची कार घ्या.

EMI किती असावी?२०-४-१० नियमानुसार तुमचा एकूण वाहतूक खर्च (कार EMI सह) तुमच्या मासिक पगाराच्या १० टक्क्यांपेक्षा कमी असावा. ईएमआय व्यतिरिक्त, वाहतूक खर्चामध्ये इंधन आणि देखभाल खर्च देखील समाविष्ट आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तरे जिथे समाधानकार मिळतील अशीच कार तुमच्यासाठी योग्य राहील.

या गोष्टी महत्त्वाच्या

  • शक्य तितके डाउन पेमेंट करा.
  • अपग्रेडेड मॉडेल खरेदी करण्याऐवजी तुम्ही कारचे बेस मॉडेल खरेदी करू शकता. हे तुम्हाला स्वस्त पडेल. 
  • मागील वर्षातील उरलेल्या नवीन कारचे मॉडेल तुम्हाला स्वस्त पडेल.
  • तुमच्याकडे जर कार असेल तर आणखी बचतीसाठी काही दिवस जुनीच वापरा. 
  • तुमचं बजेट कमी असेल तर नवीन कार खरेदीपेक्षा तुम्ही जुनीही घेऊ शकता.

या गोष्टी टाळा

  • आकर्षक जाहिरात किंवा कुणाच्या सांगण्यावरुन बजेटबाहेरची कार घेऊ नका.
  • सध्या फायनान्स कंपन्या वाहन कर्ज खूप सुलभ पद्धतीने देतात. मात्र, त्यांचा व्याजदर जास्त असतो. हा मोह शक्यतो टाळा.
  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कार घेण्याची खरच आवश्यकता आहे का? हे स्वतःला विचारा.
  • कुठलंही वाहन घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी एकदा कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करा. 
टॅग्स :कारगुंतवणूकबँक