Join us  

UPI Cash Deposit: आता UPI च्या माध्यमातून ATM मध्ये जमा करू शकाल पैसे; कसं करणार काम, केव्हा होणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 1:31 PM

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी युनिफाइड पेमेंट इंटरफेसबाबत (UPI) एक मोठी घोषणा केली आहे. आता UPI च्या माध्यमातून कॅश डिपॉझिटची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी युनिफाइड पेमेंट इंटरफेसबाबत (UPI) एक मोठी घोषणा केली आहे. शक्तीकांत दास यांच्या म्हणण्यानुसार, आता UPI च्या माध्यमातून कॅश डिपॉझिटची सुविधाही उपलब्ध होणार आहे. सध्या, युपीआयचा वापर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी किंवा क्युआर कोड स्कॅन करण्यासाठी आणि दुकानांमध्ये पेमेंट करण्यासाठी, तसंच ATM मधून पैसे काढण्यासाठी केला जातो. यूपीआयद्वारे कॅश डिपॉझिट मशीनमध्ये पैसे जमा करण्याची सुविधा सुरू केली जाईल. ही सुविधा कधी सुरू होणार? यासाठी कोणतीही निश्चित तारीख देण्यात आलेली नाही. परंतु त्यांच्या वक्तव्यावरून युपीआय अधिक युझर फ्रेंडली करण्यावर त्यांच्या भर असल्याचं दिसून येत आहे.

 

कसे जमा होतील पैसे?

 

UPI कार्डलेस कॅश डिपॉझिट सुविधा UPI कॅश काढण्यासारखीच असेल. याचा अर्थ ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवरून थेट यूपीएशी जोडलेल्या एटीएममध्ये रोख रक्कम जमा करता येणार आहे. यासाठी तुम्हाला डेबिट कार्ड वगैरेची गरज भासणार नाही. पैसे फक्त UPI डिटेल्समधूनच जमा केले जाऊ शकतात. सध्या ग्राहक युपीआयच्या माध्यमातून पैसे काढू शकतात. ज्याप्रमाणे आता एटीएम स्क्रीनवर युपीआय द्वारे पैसे काढण्याचा पर्याय दिसतो, त्याचप्रमाणे UPI कॅश डिपॉझिटचा पर्याय येईल आणि त्यानंतर ग्राहक रोख रक्कम जमा करू शकतील. 

रिटेल गुंतवणूकदारांसाठी अॅप 

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणखी एक सुविधा जाहीर केली आहे. आरबीआय रिटेल डायरेक्ट अंतर्गत ॲप लॉन्च करेल. याद्वारे गुंतवणूकदार थेट आरबीआयकडे सरकारी सिक्युरिटीजमध्ये सहज गुंतवणूक करू शकतील. सध्या, तुम्ही आरबीआय पोर्टलद्वारे सरकारी सिक्युरिटीजमध्ये थेट गुंतवणूक करण्यासाठी रिझर्व्ह बँकेत खातं उघडू शकता.

टॅग्स :एटीएमपैसा