Join us
Daily Top 2Weekly Top 5

IMPS द्वारे पैसे पाठवणं महागणार; 'या' दिग्गज सरकारी बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिला मोठा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 09:59 IST

IMPS Money Transfer: डिजिटल बँकिंगचा वापर करणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या दिग्गद बँकेनं आयएमपीएसद्वारे पैसे पाठवणाऱ्यांना झटका दिलाय.

IMPS Money Transfer: डिजिटल बँकिंगचा वापर करणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, भारतीय स्टेट बँकेनं (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. आता मोबाईल ॲप किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून 'इमिजिएट पेमेंट सर्व्हिस' (IMPS) द्वारे पैसे पाठवणे पूर्वीसारखं स्वस्त राहणार नाही. बँकेनं IMPS व्यवहारांवर नवे चार्जेस लागू करण्याचा निर्णय घेतला असून, हे बदल १५ फेब्रुवारीपासून प्रभावी होतील.

आतापर्यंत SBI चे बहुतांश ग्राहक ऑनलाइन IMPS ट्रान्सफरचा वापर विनामूल्य करत होते, परंतु नवीन नियमांनुसार मोठी रक्कम पाठवण्यासाठी शुल्क भरावं लागेल. मात्र, सर्वसामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक बाब ही आहे की, २५,००० रुपयांपर्यंतची रक्कम IMPS द्वारे पाठवणे पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे विनामूल्य असेल. म्हणजेच लहान व्यवहार करणाऱ्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काची काळजी करण्याची गरज नाही.

गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या

SBI चे नवीन नियम

SBI च्या नवीन नियमांनुसार, जर एखादा ग्राहक ऑनलाइन चॅनेलद्वारे २५,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम IMPS नं ट्रान्सफर करत असेल, तर त्याला शुल्क द्यावं लागेल. २५,००० ते १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम पाठवण्यासाठी २ रुपये शुल्क आणि त्यावर लागू होणारा जीएसटी (GST) द्यावा लागेल. त्याचप्रमाणे, १ लाख ते २ लाख रुपयांच्या IMPS व्यवहारावर शुल्क वाढून ६ रुपये अधिक जीएसटी असं होईल. याव्यतिरिक्त, २ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंतची मोठी रक्कम IMPS द्वारे ट्रान्सफर केल्यास १० रुपये शुल्क आणि जीएसटी भरावा लागेल.

हा बदल का केला?

डिजिटल सेवांची देखभाल आणि संचालन खर्च लक्षात घेऊन हा बदल करण्यात आल्याचं बँकेनं म्हटलंय. विशेष म्हणजे, हे नवीन चार्जेस केवळ मोबाईल ॲप आणि इंटरनेट बँकिंगद्वारे केलेल्या IMPS व्यवहारांवरच लागू होतील. जर ग्राहकानं बँकेच्या शाखेत जाऊन IMPS द्वारे पैसे पाठवले, तर तेथे पूर्वीप्रमाणेच लागू असलेले शुल्क कायम राहील.

डिजिटल ग्राहकांवर होणार परिणाम

तज्ज्ञांच्या मते, या निर्णयाचा परिणाम मोठ्या रकमेचे डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकांवर होईल, तर छोटे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. तरीही, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या काळात SBI नं उचललेले हे पाऊल चर्चेचा विषय ठरलं आहे. अशा परिस्थितीत, ग्राहकांना व्यवहार करण्यापूर्वी शुल्काची माहिती तपासून घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : SBI Hikes IMPS Charges: Millions of Customers Impacted

Web Summary : SBI increases IMPS transfer charges for amounts exceeding ₹25,000 via mobile app and internet banking, effective February 15th. Charges vary based on the transaction amount, impacting digital customers.
टॅग्स :एसबीआयस्टेट बँक आॅफ इंडिया