SBI Home Loan देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ग्राहकांना स्वातंत्र्य दिनी दिलासा दिला आहे. बँकेच्या या निर्णयानंतर ग्राहकांच्या खिशावरील भार कमी होणारे. जाणून घेऊया काय आहे कर्जाचे नवे व्याजदर.
एसबीआयनं गृहकर्ज आणि कारशी संबंधित कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. यामुळे तुमच्या जुन्या गृहकर्जाचा हप्ता (ईएमआय) अथवा त्याचा कालावधी कमी होऊ शकतो. या निर्णयामुळे नवीन गृहकर्ज स्वस्तात मिळेल. ज्यांनी फ्लोटिंग रेटवर कर्ज घेतलं आहे, अशा एसबीआय ग्राहकांना याचा फायदा होणार आहे, असं बँकेकडून सांगण्यात आलंय. फ्लोटिंग रेट कर्जाचा व्याजदर हा रेपो रेटशी जोडला असतो. एसबीआयनं विविध मुदतीसाठी निधी आधारित कर्जदर (एमसीएलआर) ५ बेसिस पॉइंट्सने कमी केला. हे सुधारित दर १५ ऑगस्टपासून लागू झाले आहेत.
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
आरबीआयनं ऑगस्टमध्ये रेपो दरात बदल केला नव्हता. तरीही एसबीआयनं एमसीएलआर कमी केला आहे. या बदलानंतर एमसीएलआर दर ७.९० टक्के आणि ८.८५ टक्क्यांच्या श्रेणीत राहील. याआधी तो ७.९५ टक्के आणि ८.९० टक्के दरम्यान होता. एमसीएलआर दर कमी झाल्यानं त्याच्याशी जोडलेली कर्जे स्वस्त होतील.
'ऑनलाइन' शुल्कात बदल
एसबीआयने इंटरनेट बँकिंग किंवा योनो अॅपद्वारे पैसे पाठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इमीडिएट पेमेंट सर्व्हिस (आयएमपीएस) सेवेच्या शुल्कात बदल केला आहे. सामान्य ग्राहकांसाठी नवीन नियम १५ ऑगस्टपासून तर, कॉपॅरिट ग्राहकांसाठी ८ सप्टेंबरपासून नवे दर लागू होतील.
नवं शुल्क असं
- २,००,००१ ते ५ लाखांपर्यंतच्या व्यवहारांसाठी १० रुपये + जीएसटी
- १,००,००१ ते २ लाखांपर्यंतच्या व्यवहारांसाठी ६ रुपये + जीएसटी
- २५,००१ ते १ लाखापर्यंतच्या व्यवहारांसाठी २ रुपये + जीएसटी
- २५,००० रुपयांपर्यंत कोणतंही शुल्क नाही