SBI Credit Card : जर तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. १ सप्टेंबर २०२५ पासून एसबीआय कार्ड आपल्या नियमांमध्ये मोठे बदल करत आहे, ज्याचा थेट परिणाम कार्डधारकांवर होणार आहे. एसबीआय कार्ड्सने नोटीस जारी करून माहिती दिली आहे की, काही विशिष्ट व्यवहारांवर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट आता बंद केले जात आहेत.
हे बदल प्रामुख्याने लाइफस्टाइल होम सेंटर एसबीआय कार्ड, लाइफस्टाइल होम सेंटर एसबीआय कार्ड सिलेक्ट आणि लाइफस्टाइल होम सेंटर एसबीआय कार्ड प्राइम या कार्ड्ससाठी लागू होतील.
रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीतनव्या नियमांनुसार, या क्रेडिट कार्ड्सद्वारे ऑनलाइन केलेले काही विशिष्ट व्यवहार रिवॉर्ड पॉइंटसाठी पात्र नसतील. यामध्ये प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.
- ऑनलाइन गेमिंग: ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या कोणत्याही व्यवहारावर आता रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीत.
- सरकारी व्यवहार: सरकारी सेवांसाठी किंवा कोणत्याही सरकारी देयकांसाठी कार्डचा वापर केल्यास त्यावरही कोणतेही रिवॉर्ड पॉइंट दिले जाणार नाहीत.
- याशिवाय, अशाच प्रकारचे नियम काही मर्चंट व्यवहारांवरही लागू होतील असे बँकेने स्पष्ट केले आहे.
इतर महत्त्वाचे बदलयासोबतच, १६ सप्टेंबर २०२५ पासून सर्व सीपीपी (कार्ड सुरक्षा योजना) एसबीआय कार्ड ग्राहक त्यांच्या नूतनीकरणाच्या तारखेनुसार आपोआप अपडेटेड प्लॅनमध्ये ट्रान्सफर होतील. या बदलाची सूचना एसबीआय कार्ड्सतर्फे ठरलेल्या तारखेच्या २४ तास आधी एसएमएस किंवा ईमेलद्वारे दिली जाईल.
वाचा - आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
यापूर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्यातही एसबीआय कार्ड्सने काही महत्त्वाचे बदल केले होते. त्यात काही एसबीआय एलिट आणि एसबीआय प्राइम कार्ड वापरकर्त्यांसाठी ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतचा मोफत हवाई अपघात विमा बंद करण्यात आला होता. हे सर्व बदल लक्षात घेऊन, एसबीआय क्रेडिट कार्डधारकांनी आपल्या व्यवहारांची नोंद घ्यावी जेणेकरून रिवॉर्ड पॉइंटच्या फायद्यांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे त्यांना कोणताही त्रास होणार नाही.