Join us

इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 11:19 IST

RBI Action on Bank, NBFC: रिझर्व्ह बँकेनं (RBI) इंडियन बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसवर मोठी कारवाई केली आहे. पाहा काय आहे कारण आणि किती ठोठावलाय दंड.

RBI Action on Bank, NBFC: रिझर्व्ह बँकेनं (RBI) इंडियन बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसवर मोठी कारवाई केली आहे. नियामक अनुपालनातील काही त्रुटींबद्दल दोघांनाही दंड ठोठावण्यात आलाय. बँकिंग नियमन कायद्यातील काही तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल आणि कर्जावरील व्याजदर, किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील कर्जांवरील काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल इंडियन बँकेला १.६१ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

रिझर्व्ह बँकेनं (RBI) काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसला (एम अँड एम) ७१.३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दोन्ही प्रकरणांतील दंड नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहेत आणि संस्थांनी त्यांच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहार किंवा कराराच्या वैधतेवर निर्णय देण्याचा हेतू नाही, असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय.

अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?

या बँकेचा परवाना रद्द

रिझर्व्ह बँकेनं जालंधर येथील इम्पीरियल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केलाय. बँकेकडे पुरेसं भांडवल नसल्याने आणि कमाईची शक्यता नसल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं. रजिस्ट्रार ऑफ को-ऑपरेटिव्ह सोसायटीज, पंजाब यांना ही बँक बंद करण्याचे आणि बँकेसाठी लिक्विडेटर नेमण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली आहे. औरंगाबाद येथील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादीतचा परवाना रिझर्व्ह बँकेनं २२ एप्रिल रोजी रद्द केला होता. अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नसल्याचं आरबीआयनं म्हटलं होतं.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकमहिंद्रा