मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतीच रेपो दरात ०.५० टक्क्यांनी कपात केली आहे. मात्र अनेक बँकांनी व्याजदरात किरकोळ कपात करत कर्जे स्वस्त केलेली नाहीत. त्यामुळे सर्व बँकांनी रेपो दरात कपात करून त्याचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी कर्जे स्वस्त करावीत, असे आरबीआयने एका अहवालात म्हटले आहे. केंद्रीय बँकेने या महिन्यात प्रमुख पॉलिसी दर रेपो ०.५० टक्क्यांनी कमी करून ५.५० टक्के केला आहे. त्यामुळे कर्जे आणखी स्वस्त झाली असून, कर्जाचा ईएमआय कमी झाला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या जून बुलेटिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात म्हटले आहे की, ग्राहकांना दर कपातीचे फायदे प्रभावीपणे देण्यासाठी आर्थिक परिस्थिती अनुकूल आहे. बहुतेक बँकांनी फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या दर कपातीचे फायदे आधीच त्यांच्या ग्राहकांना दिले आहेत.
६ जूननंतर स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), बँक ऑफ बडोदा (बीओबी) आणि एचडीएफसी बँक यासह अनेक मोठ्या बँकांनी त्यांचे कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत.
युद्धाच्या तणावाचा फटका भारताला बसेल का?
जगाची अर्थव्यवस्था सध्या व्यापार धोरणातील अनिश्चितता व युद्धाच्या तणावाच्या दुहेरी धक्क्यांमुळे अस्थिर अवस्थेत आहे. या वाढलेल्या जागतिक अनिश्चिततेतही भारताने औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.
२०२४–२५ या वर्षात कृषी उत्पादनात सर्वसामान्य वाढ झाली आहे. देशांतर्गत महागाई मे महिन्यात सलग चौथ्या महिन्यात कमी आहे. वाढत्या तणावाचा अतिशय कमी फटका भारताला बसेल.
बँकांना मिळणार अतिरिक्त कॅश
व्याजदर कपातीचे फायदे कर्ज बाजाराला मोठ्या प्रमाणात देण्यासाठी आर्थिक परिस्थिती अनुकूल आहे, असे आरबीआयच्या जून २०२५ च्या 'अर्थव्यवस्थेची स्थिती' या विषयावरील बुलेटिनमध्ये म्हटले आहे.
सीआरआरमध्ये कपात केल्याने डिसेंबर २०२५ पर्यंत बँकिंग प्रणालीला सुमारे २.५ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रोख रक्कम मिळेल.
रोख रक्कम उपलब्ध होण्याशिवाय कर्ज स्वस्त केल्याने बँकांसाठी निधीचा खर्च देखील कमी होईल, ज्यामुळे क्रेडिट मार्केटमध्ये चलनविषयक धोरणांचे हस्तांतरण सुलभ होईल, असे लेखात म्हटले आहे.
घर घेण्यासाठी कोणत्या बँकेचे कर्ज परवडतेय? युनियन बँकेचा व्याजदर ७.३५%
बँक ऑफ महाराष्ट्रचा व्याजदर ७.३५%
कॅनरा बँकेचा व्याजदर ७.४०%
एसबीआयचा व्याजदर ७.५०%
पंजाब नॅशनल बँकेचा व्याजदर ७.५०%
बँक ऑफ बडोदाचा व्याजदर ७.५०%
बँक ऑफ इंडियाचा व्याजदर ७.८५%
एलआयसी हाऊसिंग फायनान्सचा व्याजदर ७.५०%
एचडीएफसीचा व्याजदर ८.४५%
आयसीआयसीआय बँकेचा व्याजदर ८.५०%
कोटक महिंद्रा बँकेचा व्याजदर ८.२०%
ॲक्सिस बँकेचा व्याजदर ८.७५%