New India Co-operative Bank News: काही दिवसांपूर्वी मुंबईतील टोरेस कंपनी बंद झाल्याने खळबळ उडाली होती. कंपनीच्या ऑफिसबाहेर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एका बातमीने मुंबईकरांच्या धडधड वाढवली. मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंंध लादले आहेत. आता ना बँकेला कोणता व्यवहार करता येणार, ना ग्राहकांना पैसे जमा किंवा काढता येणार. आरबीआयने बँकांमधील सर्व प्रकारच्या अत्यावश्यक कामांवर पुढील ६ महिन्यांसाठी निर्बंंध घातले आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या पैशाचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे
आरबीआयने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकच्या केवळ व्यवहारांवर निर्बंंध लादले आहेत. बँकेचा परवाना अद्याप रद्द केला नाही. याचा अर्थ तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले की, अलीकडच्या काळात बँकेने केलेल्या काही अनियमिततेमुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने सहकारी बँकेला कोणतीही गुंतवणूक किंवा कर्ज घेऊ नये, असे आदेश दिले आहेत.
आरबीआयने बँकेवर कारवाई का केली?न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक गेल्या २ आर्थिक वर्षांपासून तोट्यात चालली आहे, बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, मार्च २०२४ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला २२७.८ दशलक्ष रुपये तर आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ३०७.५ दशलक्ष रुपयांचा तोटा होणे अपेक्षित आहे. बँकेचे आगाऊ कर्ज ३१ मार्च २०२४ पर्यंत ११.७५ अब्ज रुपयांवर घसरले, जे एका वर्षापूर्वी १३.३० अब्ज रुपये होते. त्याच वेळी, या कालावधीत बँकेतील एकूण ठेवी २४.०६ अब्ज रुपयांवरून २४.३६ अब्ज रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.
परवाना रद्द झालेला नाहीआरबीआयने सध्या ६ महिन्यांसाठी बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांवर निर्बंंध लादले आहे. याचा अर्थ बँकेचा बँकिंग परवाना रद्द झाला असा नाही, असे आरबीआयने म्हटले आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत असून बँकेच्या परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहे. आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल. यापूर्वी देखील २०१९ मध्ये आरबीआयने आर्थिक अनियमिततेमुळे पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर बंदी घातली होती.