Join us

तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:11 IST

Personal Loan Disadvantages : आजकाल महागड्या मोबाईलपासून परदेशी सहलीपर्यंत अनेक कारणांसाठी वैयक्तिक कर्ज घेतलं जात आहे. पण, वारंवार कर्ज घेणे अंगलट येऊ शकतं.

Personal Loan Disadvantages : आजच्या काळात वैयक्तिक कर्ज घेणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. तुमच्या आसपास असणाऱ्या १० पैकी ७ लोकांनी कधी ना कधी पर्सनल लोन घेतले असेल अशी स्थिती आहे. कमी कागदपत्रे, कुठलेही तारण किंवा जामिनदार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झटपट मिळत असल्याने हे लोकप्रिय होत आहे. काही लोक तर वारंवार अशा प्रकारचे कर्ज काढत असतात. तुम्हालाही अशीच सवय असेल तर आताच सावध राहा. अन्यथा तुमची ही सवय तुमचं मोठं आर्थिक नुकसान करू शकते. आज आम्ही तुम्हाला वैयक्तिक कर्जाच्या अशा ५ मोठ्या तोट्यांबद्दल सांगत आहोत, ज्यांबद्दल तुम्ही वेळीच सावध असले पाहिजे. 

जास्त व्याजदारझटपट मिळत असल्याने अनेकजण कर्जाच्या व्याजदराकडे लक्ष देत नाही. पण, वैयक्तिक कर्जाला इतर कोणत्याही कर्जापेक्षा सर्वाधिक व्याजदर आकारला जातो. कधीकधी तो १०% ते २४% पर्यंत असू शकतो. जेव्हा तुम्ही वारंवार वैयक्तिक कर्ज घेता तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळी जास्त व्याज द्यावे लागेल. यामुळे तुमच्या मासिक उत्पन्नाचा मोठा भाग फक्त ईएमआयवर खर्च होईल. म्हणूनच जेव्हा ते अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज घ्या. त्याऐवजी, तुम्ही सोनेतारण कर्ज किंवा एफडीवर कर्ज घेण्याचा विचार करू शकता.

क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणामतुम्ही जर वारंवार वैयक्तिक कर्ज घेत असाल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो. कारण जेव्हा जेव्हा कोणतीही संस्था तुम्हाला कर्ज देते तेव्हा ते प्रथम तुमचा क्रेडिट इतिहास तपासतात. कमी क्रेडिट स्कोअरमुळे भविष्यात कर्ज मिळणे कठीण होऊ शकते.

कर्जबाजारीवारंवार कर्ज घेण्याची सवय तुमच्यावर आर्थिक भार टाकू शकते. अनेक लोक एका कर्जाची परतफेड करण्यासाठी दुसरे कर्ज उचलतात. परिणामी कर्जाच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता असते. याचा तुमच्या बचत आणि गुंतवणुकीवर परिणाम होतो. मानसिक ताण आणि आर्थिक अस्थिरता देखील निर्माण होते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, कर्जाची गरज भासणार नाही म्हणून बजेट बनवा आणि अनावश्यक खर्च कमी करा.

आर्थिक ध्येय साध्य करण्यास अडथळाजेव्हा तुम्ही वारंवार वैयक्तिक कर्ज घेता तेव्हा तुमच्या उत्पन्नाचा मोठा भाग कर्जाची परतफेड करण्यात जातो. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे जसे की निवृत्ती नियोजन, मुलांचे शिक्षण, घर खरेदी करणे किंवा इतर ध्येय पूर्ण करू शकत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही भविष्यातील मोठ्या गरजांसाठी बचत करू शकणार नाही. म्हणून, कर्ज घेण्यापूर्वी, तुम्ही तुमची दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे लक्षात ठेवली पाहिजेत.

वाचा - पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?

सुलभ मिळतंय म्हणून अतिरिक्त खर्चात वाढवैयक्तिक कर्ज सहज उपलब्ध आहे, म्हणूनच लोक त्यांच्या अनावश्यक गोष्टींसाठी देखील कर्ज घेतात. उदा. हौसेसाठी महागडा मोबाईल, परदेशी सहल, गरज नसताना वाहन. त्यामुळे तुमच्या बचतीवर याचा परिणाम होतो. लक्षात ठेवा पर्सनल लोन हे कायम आर्थिक आणीबाणीवेळी घेतले पाहिजे. जसे की वैद्यकीय, शिक्षण इत्यादी आपत्कालीन गरजांसाठीच वैयक्तिक कर्ज घेतले पाहिजे.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकगुंतवणूक