Join us

आता बँका आठवड्यातून फक्त ५ दिवसच उघडणार? कर्मचारी का करतायेत ५ डे वर्क वीकची मागणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 15:58 IST

Bank Strike: येत्या २४-२५ मार्च रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यांच्या अनेक मागण्यांमध्ये आठवड्यातून ५ दिवस बँकेत काम करण्याची मागणी देखील समाविष्ट आहे.

Bank Strike: कामाचे तास किती असावेत यावरुन देशात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांनी आठवड्यात ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून या वादाला तोंड फुटले. देशात बँकिंग कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ५ दिवस (सोमवार ते शुक्रवार) काम करावे अशी अनेक दिवसांपासून मागणी आहे. या मागणीसह  युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने २४ आणि २५ मार्च रोजी देशव्यापी बँक संपाची घोषणा केली आहे. सध्या बँकेत सहा दिवस काम सुरू आहे.

काम-जीवनात समतोल राखणे महत्त्वाचेकामाचे दिवस आणि विविध मागण्यांच्या मुद्द्यांवर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) सोबत बैठक झाली. मात्र, यात काहीच तोडगा न निघाल्याने देशभरातील बँक कर्मचारी सोमवार आणि मंगळवारी संपावर जाणार आहेत. बँक युनियन आठवड्यातून ५ दिवस काम करण्याची मागणी का करत आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काम-जीवनामध्ये समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून ५ दिवस काम करण्याची मागणी केली जात आहे.

काय होत आहे ही मागणी?आठवड्यातून ६ दिवस काम असल्यास स्वत:साठी किंवा कुटुंबासाठी वेळ मिळत नाही. शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ पुरत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आठवड्यातून ५ दिवस काम केल्यास उत्पादनक्षमता आणि कामगिरी सुधारेल, असा विश्वास बँक कर्मचाऱ्यांना वाटतो. यामुळे तणाव आणि थकवा येणार नाही. एकूणच कामाचे वातावरण चांगले राहील. जगातील बहुतेक देशांमध्ये बँका आठवड्यातून फक्त पाच दिवस काम चालते, असा युक्तिवाद कर्मचाऱ्यांनी केला.

युनियनच्या इतर मागण्या

  • सर्व संवर्गात पुरेशी भरती असावी जेणेकरून कामाचा ताण कमी होईल. 
  • कामगिरीवर आधारित मूल्यांकन आणि प्रोत्साहन योजना मागे घेण्याची मागणी.
  • अस्थायी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण.
  • बँक कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी. 
  • पीएसबीमध्ये कामगार किंवा अधिकारी संचालकांची पदे भरण्याची मागणी. 
  • कमाल मर्यादा २५ लाखांपर्यंत वाढवण्यासाठी ग्रॅच्युइटी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी. 
टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकसंप